कर्जत – प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येचा धक्का अजूनही न पचण्यासारखा आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ४ वाजता एन.डी स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मुंबईतील जेजे रुग्णालयात जाऊन नितीन देसाईंच्या पार्थिवाचं अत्यंदर्शन घेतलं. त्यांच्यासोबत मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही दिवंगत कलादिग्दर्शकाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
नितीन देसाईंची मुले आज अमेरिकेतून परतणार आहेत. यानंतर त्यांच्या पार्थिवावर दुपारी ४ वाजता त्यांच्या एन.डी स्टुडिओत अंत्यसंस्कार पार पडतील. एन.डी स्टुडिओमध्ये ‘जोधा अकबर’ सिनेमाचा सेट ज्या ठिकाणी उभारण्यात आला होता त्या ठिकाणी अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली आहे.
एडेलवाईस कंपनीवर गुन्हा दाखल होणार
नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी सापडलेल्या ऑडिओ क्लिप्समध्ये एडेलवाईस कंपनीडून कर्ज घेतल्याने व ते फेडता न आल्याने या कंपनीने मानसिक छळ केल्याचा आरोप नितीन देसाई यांनी केला आहे. आज देसाईंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर या कंपनीवर गुन्हा दाखल होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.