खलघाट बस अपघात : एस.टी.चालकासह वाहकासह दहा जणांची ओळख पटली : चौघे मयत अमळनेरचे रहिवासी

इंदौर : अमळनेर आगाराची इंदौर-अमळनेर बस (एम.एच.40 एन.9848) नियंत्रण सुटल्याने नर्मदा नदीत कोसळून 13 प्रवासी ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी 10 वाजता मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील खलघाट घडली होती. मयतांपैकी आतापर्यंत आठ पुरूष, चार महिला व एका बालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे तर काही प्रवासी वाहून गेल्याची भीती आहे. बचावकार्याला गती देण्यात आली असून स्थानिक प्रशासनासह जिल्हाधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान, एस.टी.अपघातात मयत प्रवाशांच्या वारसांना दहा लाखांची मदत तातडीने देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असून दहा मृतांची ओळख पटवण्यात यश आले असून त्यातील चौघे अमळनेर तालुक्यातील रहिवासी आहेत.

एस.टी.चालक-वाहकासह दहा प्रवासी ठार : अपघातातील मयत असे

1) राम गोपाल जांगीड (नांगल कला, गोविंदगढ, जयपूर, राजस्थान)

2) हेमराज जोशी (70, मल्हारगढ, उदयपुर राजस्थान)

3) श्रवण चौधरी (40, शारदा कॉलनी, अमळनेर)

4) आनंदा पाटील (60, पिळोदा, ता.अमळनेर)

5) निंबाजी पाटील (55, पिळोदा, ता.अमळनेर)

6) एकनाथ पाटील (45, अमळनेर, जि.जळगाव)

7) मुर्तजा बोरा (27, मूर्तिजापुर, अकोला)

8) अब्बास (नूरानी नगर, इंदौर)

9) एस.टी.बस चालक चंद्रकांत एकनाथ पाटील

10) एस.टी. वाहक प्रकाश श्रावण चौधरी

पंतप्रधानांचे ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. पीएमओने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मध्य प्रदेशातील धार येथे घडलेली बस दुर्घटनेची घटना दु:खद आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. बचावकार्य सुरू असून स्थानिक अधिकारी बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहेत.

मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली माहिती

मध्य प्रदेशात नर्मदा नदीमध्ये सोमवारी सकाळी अमळनेर आगाराची एस.टी.महामंडळाची बस कोसळून झालेल्या अपघाताबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश जळगाव जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत.अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्याशी देखील बोलून मध्यप्रदेश मधील खरगोन व धार जिल्हा प्रशासनाला अपघातग्रस्त व्यक्तींना आवश्यक ते सहकार्य करण्याचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.

मुख्यमंत्री मदत कार्यावर लक्ष ठेवून

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील सूचना केल्या असून बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. मृतदेह बाहेर काढून योग्य प्रक्रियेनंतर त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात देण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. मुख्यमंत्री स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत.

जळगावात नियंत्रण कक्षाची स्थापना

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या अपघातासंदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती देखील जळगाव जिल्हाधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. या नियंत्रण कक्षाचा क्रमांक 02572223180 आणि 02572217193 असा आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh