केजरीवालांच्या अटकेचा मुद्दा जागतिक पातळीवर; अमेरिका, जर्मनीनंतर आता संयुक्त राष्ट्रांची प्रतिक्रिया समोर

दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक केली. गुरुवारी ईडी कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत 4 दिवसांची वाढ केली. ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत केजरीवाल यांच्या अटक केल्याने विरोधक आक्रमक झाले असून याविरोधात 31 मार्च रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘इंडिया’ आघाडीची महारॅलीही होणार आहे. केजरीवाल यांच्या अटकेवरून देशभरात गोंधळ सुरू असताना त्यांच्या अटकेचा मुद्दा आता जागतिक पातळीवर पोहोचला आहे. अमेरिका, जर्मनीनंतर आका संयुक्त राष्ट्रांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Arvind Kejriwal यांच्या अटकेनंतर अमेरिका आणि जर्मनीने टिप्पणी केली होती. यावर हिंदुस्थानने विरोधही व्यक्त केला होता. आता संयुक्त राष्ट्रांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. निष्पक्ष निवडणूक व्हावी आणि सर्वांच्या अधिकाराचे रक्षण व्हावे, असे संयुक्त राष्ट्रांच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.