जि.प. चे सीईओ अंकित यांचेवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही

जळगाव जिल्हा रुग्णालयात सकाळी नातेवाईकांचा आक्रोश

जळगाव -: जिल्ह्यातील महिला बालकल्याण अधिकारी मयुरी करपे राऊत यांचा हृदयविकाराने शनिवार दि. १४ सप्टेंबर रोजी दुपारी मृत्यू झाला होता. याप्रकरणी मयुरी करपे यांच्या माहेरच्या मंडळींनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप लावले असून त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा मृत्यूदेह उचलणार नाही असा पवित्रा जिल्हा रुग्णालयात घेतला आहे.

मयुरी देवेंद्र राऊत करपे (वय ३२, रा.श्रीराम नगर, दादावाडी परिसर, जळगाव) असे मयत महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांचे पती देवेंद्र राऊत हे देखील जिल्हा परिषदेमध्ये महिला व बालकल्याण अधिकारी आहेत.(केसीएन)त्यांना दोन मुली आहेत. दरम्यान शनिवार दि. १४ सप्टेंबर रोजी रुग्णालयामध्ये उपचारासाठी गेलेले असताना त्या ठिकाणी मयुरी करपे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.यानंतर मात्र एकच खळबळ उडाली. त्यांच्या परिवारामध्ये शोकाकुल वातावरण झाले.

रविवारी मयुरी करपे यांचे वडील प्रगतिशील शेतकरी भाऊसाहेब करपे व त्यांचा परिवार जळगावात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांच्या परिवाराने प्रचंड आक्रोश केला. मयुरी यांच्या दोन मुलींचा आक्रोश पाहून अनेकांचे मन हेलावले.

भाऊसाहेब करपे यांनी जळगाव संदेश ला माहिती दिली की, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित हे देवेंद्र राऊत यांना मानसिक त्रास देत होते. बैठकांमध्ये सतत अपमान करणे, त्यांना असभ्य भाषेत बोलणे अशा पद्धतीचा त्रास राऊत यांना दिला गेला. त्यामुळे देवेंद्र राऊत हे मानसिक तणावात होते. तणावामुळे त्यांनी काही काळ रजादेखील घेतली होती.

दवाखान्यात सातत्याने उपचार सुरू झाले. यामुळे पूर्ण कुटुंबच मानसिक तणावाखाली गेले. देवेंद्र राऊत व त्यांच्या पत्नी मयुरी राऊत यांचेदेखील मनस्वस्थ बिघडले. मुख्य कार्यकारी अधिकारी हे ज्या पद्धतीने प्रशासनाशी बोलतात वागतात व कामकाज करतात त्याचा हा बळी आहे असेही भाऊसाहेब करपे यांनी सांगितले.

तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे देखील तक्रार केली असून कनिष्ठ अधिकाऱ्यांना मानसिक तणावाखाली ठेवून त्यांचे मनस्वास्थ्य बिघडवणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी भाऊसाहेब करपे यांनी केली आहे.

ताजा खबरें