भंडारा – कोणतेही महत्त्वपूर्ण शासकीय कार्य करण्यासाठी शिक्षकच महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पडू शकतात, असा समज शासनाचा झालेला आहे. त्यामुळे महत्त्वपूर्ण सर्वेक्षण अथवा आकडेवारी संकलित करायची असल्यास शिक्षकांची नियुक्ती त्यासाठी केली जाते.
सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे ठरविले आहे.
मराठा व खुल्या प्रवर्गाची महत्त्वपूर्ण माहिती संकलित करण्यासाठी प्रगणक म्हणून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र शिक्षक आपल्या या महत्त्वपूर्ण कामात हलगर्जीपणा करीत असल्याचा प्रकार भंडारा जिल्ह्यात उघड झाला. प्रगणक असलेले शिक्षकच या महत्त्वपूर्ण नोंदणी करण्यासाठी आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा उपयोग करीत आहे. यासंबंधीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला.
मराठा नोंदणी सर्वेक्षणाला शाळेतील विद्यार्थ्यांचा उपयोग केला जात असल्याने शिक्षण सोडून विद्यार्थी वर्गाबाहेर शिक्षकांसोबत फिरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संकलित करीत असलेली ही माहिती विश्वसनीय आहे का, हा प्रश्न यामुळे निर्माण झालेला आहे. हा संपूर्ण प्रकार लाखनी तालुक्यातील गोंडेगाव येथे घडला आहे. एका सुज्ञ व्यक्तीने या शिक्षकाचा व्हिडीओ बनवत हा प्रकार उघडकीस आणलेला आहे.
दरम्यान, हा प्रकार जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी आणि शिक्षण सभापती यांच्या लक्षात आल्याने याप्रकरणी चौकशी आदेश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे आधीच सुरू असलेल्या या सर्वेक्षणाबाबत जिल्ह्यात संभ्रमावस्था निर्माण झाली असताना आता चक्क या सर्वेक्षणातून संकलित केलेल्या माहितीची विश्वसनीयता धोक्यात आली आहे. मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाचा धसका घेत राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हालचाल सुरू केलेली आहे.
जरांगे-पाटलांची कुणबी समाजातून मराठ्यांना आरक्षण मिळावे व कुणबी प्रमाणपत्र मिळावे, हाही हट्ट सरकारने मान्य करीत राज्यात मराठा समाजाचे सर्वेक्षण सुरू केलेले आहे. यासाठी जबाबदार व्यक्ती असलेले शिक्षक प्रगणक म्हणून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत नोंदी घेत आहेत. या सर्वेक्षणाअंतर्गत मराठा व खुल्या वर्गातील व्यक्ती, त्यांच्या कुटुंबाची विस्तृत माहिती गोळा करायची आहे. मागासवर्गाशी संबंधित व्यक्तींची फक्त नोंद करायची आहे.
मराठा व खुल्या प्रवर्गातील व्यक्तींकडून 154 प्रश्नांची उत्तरे घ्यायची आहेत. याशिवायही इतर काही माहिती प्रगणकांना गोळा करायची आहे. इथंपर्यंत सर्व ठीक होतं, मात्र शिक्षक ही नोंदणी करीत असताना विद्यार्थ्यांना सोबत घेऊन फिरत आहेत. विद्यार्थ्यांच्या हातात बुक आणि पेन राहत असून त्यांच्याद्वारे बुकवर नोंदणी केली जात आहे. लाखनी तालुक्यातील व्हायरल झालेल्या शिक्षकाचा व्हिडीओ सध्या तरी हीच करणी सांगत आहे.
विशेष म्हणजे त्या विद्यार्थ्यांना ही महत्त्वपूर्ण माहिती समजली नाही किंवा चुकीची ऐकू आली, तर त्या विद्यार्थ्याद्वारे चुकीच्या नोंदणी होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे अशा महत्त्वपूर्ण नोंदणी गोळा करीत असताना विद्यार्थ्यांचा वापर शिक्षकांनी करणे योग्य आहे का, हाच खरा प्रश्न यातून निर्माण होत आहे. दुसरीकडे चौकशी होऊन त्या शिक्षकावर कारवाई होईलही. मात्र त्यांनी आतापर्यंत केलेले सर्वेक्षण योग्य आहे की नाही, हेसुद्धा तपासण्याची गरज आहे.