जळगावात शिवजयंती मिरवणुकीला गालबोट, दगडफेकीत 6 जण जखमी

जळगाव – तालुक्यातील शिरसोलीत तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीला गालबोट लागल्याच्या प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी शिवजयंती मिरवणुकीवर अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे.

या दगडफेकीत 5 ते 6 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी शिरसोली गाठले. या ठिकाणी पोलिसांचे दंगा नियंत्रण पथक तळ ठोकून आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 10 जणांना ताब्यात घेतले आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार 28 मार्च रोजी जयंती होती. सलाबाद प्रमाणे जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथे शिवजयंती साजरी करण्यात येते. त्यानिमित्त सायंकाळी शिरसोली प्र. बो. येथील इंदिरा नगर येथून शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक ढोलताश्यांच्या गजरात वाजत गाजत जात असताना मिरवणूक रात्री 8 वाजेच्या सुमारास मश्जिदजवळ आली. यावेळी मिरवणुकीतील वाद्य बंद केले होते. त्याच वेळी अचानक या मिरवणुकीवर अज्ञातांनी दगडफेक सुरु केली. अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे कोणाला काही न कळता धावपळ सुरु झाली. या दगडफेकीत 5 ते 6 जखमी झाले असून यातील विशाल दिलीप पाटील, मंगेश साहेबराव पाटील, बाळू तुळशीराम पाटील हे गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेता या ठिकाणी दंगा नियंत्रण पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र गावात तणावपूर्ण शांतता आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी यांनीही भेट देत पाहणी केली.

jalgaonsandesh

jalgaonsandesh