बैलपोळ्याच्या आनंदावर विरजण! बैलच ठरला शेतकऱ्यासाठी काळ; जळगावात धक्कादायक घटना

जळगाव – बैलपोळा हा शेतकऱ्यासाठी खास सण, शेतात राबणाऱ्या बैलासाठी हा सण खास साजरा केला जातो. बैलाला छान तयार केलं जातं, त्याला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. बैलपोळ्यासाठी बैलाला तयार करण्याचं कसब आणि कौशल्य दोन्ही पणाला लागतं.

पोळ्यानिमित्ताने शेतकरी बैलाला तयार करत असताना मोठी दुर्घटना घडली.

बैलपोळ्याची तयार करत असताना बैल उधळला आणि शेतकऱ्याचा जागीच जीव गेला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बैलांची शिंगं घासत असताना तो उधळला. शेतकरी तोल जाऊन खाली कोसळला. बैल जास्त रागात असल्याने त्याने मालाकालाही पाहिलं नाही. त्याने शेतकऱ्याच्या गळ्यावर पाय दिला आणि शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

ही धक्कादायक घटना जळगावच्या जामनेर तालुक्यातील पाहूर परिसरात घडली आहे. विठ्ठल भंडागे असं मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. शेतकरी विठ्ठल बैलाला तयार करत असताना त्यांनी त्याची शिंग घासायला घेतली. ते खाली बसले आणि शिंग घासत असताना अचानक बैल उधळला. शेतकऱ्याचा तोल गेला आणि ते खाली कोसळले

बैल बांधलेला असल्याने त्याला जास्त हालचाल करता आली नाही. या सगळ्यात दाव्याला बांधलेल्या बैलाच्या गळ्याला फास लागला आणि तो जीव वाचवण्यासाठी जास्त धडपड करू लागला. आजूबाजूच्या लोकांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी बैलाच्या गळ्याभोवतीचं दावं काढून त्याला मोकळं केलं. तर शेतकरी विठ्ठल यांचा मृत्यू झाल्याचं त्यांना दिसलं.

मुलगा आणि पुतण्याला ही माहिती मिळताच त्यांनी तातडीनं वडिलांना (शेतकरी विठ्ठल) रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आलं. बैलपोळ्याच्या आनंदावर विरजण पडलं आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, चार मुली, सुना, नातवंड असा परिवर आहे. या घटनेमुळे भंडागे कुटुंबियांवर दु: खाचा डोंगर कोसळला आहे.