जळगाव पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकार्‍यासह विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

जळगाव – दिवाळी सणाचा सर्वत्र उत्साह सुरू असताना दुसरीकडे मात्र जळगाव एसीबीने कारवाईचे फटाके फोडत जळगावातील सहाय्यक गटविकास अधिकार्‍यासह विस्तार अधिकार्‍याला पाच लाखांची लाच घेताना अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. मंगळवारी पाडव्याची शासकीय सुटी असताना लाचखोर महाभाग पंचायत समिती कार्यालयात आले व लाच स्वीकारताच एसीबीने काम फत्ते केले. विस्तार अधिकारी तथा सध्या पदभार सहाय्यक गटविकास अधिकारी रवींद्र शालिग्राम सपकाळे (54) व विस्तार अधिकारी पद्माकर बुधा अहिरे (53) अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत.

सुटीच्या दिवशी भोवली लाच

जामनेर तालुक्यातील 38 वर्षीय तक्रारदार हे लोकसेवक आहेत. त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या चौकशी समितीमध्ये आरोपी तथा प्रभारी सहाय्यक गटविकास अधिकारी रवींद्र शालिग्राम सपकाळे व विस्तार अधिकारी पद्माकर बुधा अहिरे हे चौकशी पथकातील प्रमुख आहेत. तुम्हाला चौकशीतून दोषमुक्त करतो, तुमचा अहवाल चांगला पाठवितो त्यासाठी आम्हाला पाच लाख रुपये लागतील, अशी मागणी 7 नोव्हेंबर रोजी दोघा लाचखोरांनी केली व लाच रक्कम देण्याचे निश्चित झाल्यानंतर लाचखोरांनी दिवाळी पाडव्याचा शासकीय सुटीचा दिवस लाच स्वीकारण्यासाठी निवडला. एरव्ही सर्वत्र शासकीय सुटी असताना अधिकारी दिवाळीचा आनंद मनवत असताना लाचखोरांनी मात्र पंचायत समितीचे दालन उघडले व तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच तक्रारदाराने इशारा करताच एसीबीने लाचखोरांच्या मुसक्या बांधल्या. लाचखोरांविरोधात जळगाव जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

jalgaonsandesh

jalgaonsandesh