जळगाव महापालिकेत महिलांची गर्दी ! सर्व्हर डाऊनमुळे लाडकी बहीण योजनेचे कामकाज ठप्प

जळगाव – ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी गेल्या चार दिवसांपासून महापालिकेत ऑनलाईन आणि ऑफलाईन फार्म भरून घेणे सुरू आहे. मात्र, शुक्रवारी (ता. १२) सर्व्हर डाऊन असल्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या कामाला फटका बसला असून, काही महिलांना अर्ज न भरता घरची वाट धरावी लागली.

त्यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली.

आता दोन दिवस महापालिकेला सुट्टी असल्याने या योजनेच्या कामाला ब्रेक लागणार आहे. महापालिकेत गेल्या चार दिवसांपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज भरण्यासाठी दिवसागणिक महिलांची गर्दी वाढत आहे. मात्र, शुक्रवारी दुपारनंतर सर्व्हर डाउन असल्यामुळे अर्ज भरण्याच्या कामाला ब्रेक लागला.

कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न करूनही अर्ज भरण्यास सर्व्हर डाऊनचा फटका बसत असल्याने महिलांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी ११ ते दुपारी बारापर्यंत सर्व्हर हळूहळू चालत असल्याने कर्मचारीही त्रस्त झाले होते. दुपारनंतर सर्व्हर डाउन झाल्यामुळे अर्ज भरण्याच्या कामकाजाला ब्रेक लागला आणि महिलांना तासन्‌तास उभे राहावे लागले.

काही महिलांनी कंटाळून अर्ज न भरताच घराची वाट धरली, तर काही महिला सायंकाळी साडेपाचपर्यंत ठाण मांडून बसल्या होत्या. शनिवारी (ता. १३) आणि रविवारी (ता. १४) महापालिकेस शासकीय सुट्टी असल्याने दोन दिवस लाडकी बहीण योजनेचे कामकाज बंद राहणार आहे. सोमवारी (ता. १५) पुन्हा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू राहील, अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली.

jalgaonsandesh

jalgaonsandesh