जळगाव विमानतळावर राज्यातील पहिले हेलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्र

जळगाव : राज्यातील पहिले हेलिकॉप्टर ट्रेनिंग सेंटर जळगाव विमानतळावर होत असून तीन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून

३० विद्यार्थ्यांना याचे प्रशिक्षण देण्यात येईल अशी माहिती जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी शुक्रवारी ‘प्रहार’शी बोलतांना दिली.

केंद्र सरकारने देशात आठ पायलट ट्रेनिंग सेंटर सुरू केले असून त्यात राज्यात जळगावला एक ट्रेनिंग सेंटर मिळालेले आहे. सध्या जळगाव विमानतळावर स्कायनेक्स एरो प्रायव्हेट लि. कडून पायलट ट्रेनिंग सेंटर चालवण्यात येत असून पाच विमानांच्या सहाय्याने ३० जणांना प्रशिक्षण देणे सुरू आहे. याचा पुढील टप्पा म्हणून आता या विमानतळावर हेलिकॉप्टर ट्रेनिंग सेंटर सुरू होत आहे. परवानगीच्या सर्व बाबी पूर्ण होताच हे सेंटर सुरू होईल आणि राज्यातील हे पहिलेच हेलिकॉप्टर ट्रेनिंग सेंटर ठरेल. या ट्रेनिंग सेंटरमध्ये तीन हेलिकॉप्टरच्या सहाय्याने ३० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल अशी माहिती जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी बोलतांना दिली.

जळगाव विमानतळावर पाच हजार चौ मीटर जागा उपलब्ध असून त्याचा पुरेपूर वापर करत जळगाव हे वैमानिक प्रशिक्षणाचे हब व्हावे अशी आपली इच्छा असल्याचे सांगत त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. या दोन्ही ट्रेनिंग सेंटरच्या उदघाटनासाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांना बोलावण्यात येणार असल्याचे खा. उन्मेष पाटील यांनी सांगितले.

दरम्यान जळगाव ते पुणे विमानसेवेसाठी नागरिकांची मोठी मागणी असल्याने ही सेवा सुरू करण्यासाठी दोन कंपन्यांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. जळगाव विमानतळावरील धावपटटी सध्या १७५० मीटर असून याचा ३३०० मीटरपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. विमानतळा पलीकडे असलेल्या एका रस्त्यामुळे हे विस्तारीकरण रखडले आहे.

या रस्त्याचे काम पूर्ण होताच धावपटटी विस्तारीकरणा-या कामास सुरवात करण्यात येईल, अशी माहिती खा. उन्मेष पाटील यांनी दिली.