जळगावमध्ये गुरांची तस्करी करणाऱ्या आरोपींकडून पोलिस अधिकाऱ्याच्या जीवावर बेतणारा हल्ला

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर भागात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुरांची तस्करी करणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी शर्थीचा पाठलाग केला. दरम्यान, आरोपींनी वाहन रिव्हर्स घेत पाटील यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात पोलिस अधिकारी संदीप पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्या बोटाला, पायाला व पोटाजवळील बारगड्यांना दुखापत झाली आहे.

मात्र जखमी अवस्थेतही त्यांनी हार न मानता घटनास्थळीच आरोपींना ताब्यात घेतले. यामुळे त्यांच्या धाडसाचे कौतुक सर्वत्र होत आहे.

नेमकं काय घडलं?

जळगाव जिल्ह्यात गस्त घालत असताना मुक्ताईनगर भागातून एक संशयित वाहन जात असल्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी वाहनासह पळून गेले. यानंतर संदीप पाटील यांनी तब्बल 100 किलोमीटर जळगाव ते अकोला दरम्यान वाहनाचा पाठलाग केला.

अकोला पोलिसांच्या मदतीने नाकाबंदी करण्यात आली. आरोपींना अटक करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी चारचाकी रिव्हर्स घेत पाटील यांच्यावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला. यात पाटील खाली पडले पण तात्काळ सावरून त्यांनी दोन आरोपींना पकडले तर इतर तिघे फरार झाले. पोलिसांनी चोरी गेलेला बैल, चारचाकी वाहन, लोखंडी रॉड, गुप्ती व छोटी तलवार असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. पोलिस अधीक्षकांनी देखील घटनेची माहिती देताना संदीप पाटील यांच्या धाडसी कारवाईचे कौतुक केले.

ताजा खबरें