जगाला देतोय मोटिवेशन, पण लग्नानंतर 8 दिवसात पत्नीची पोलिसात धाव; मारहाण अन् राडा

दिल्ली – आंतरराष्ट्रीय मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्राविरोधात नोएडा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा त्याच्या पत्नीनेच दाखल केला. बिंद्राच्या पत्नीने आरोप केला की तिला मारहाण करण्यात आली.

सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोअर्स असलेल्या विवेक बिंद्राचं ६ डिसेंबर २०२३ रोजी यानिकासोबत लग्न झालं. लग्नानंतर अवघ्या आठ दिवसातच पत्नीने पोलिसात त्याच्याविरुद्ध तक्रार दिली. १४ डिसेंबरला यानिकाने आरोप केला की, पती खूप मारहाण करतो. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार मिळताच गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मारहाणीच्या प्रकरणात यानिकाच्या कानाला दुखापत झाली आहे. पोलिसात पोहोचलेल्या यानिकाचा डोळाही काळा होता आणि बिंद्राने केलेल्या मारहाणीमुळे असं झाल्याचं सांगितलं जात आहे. नोएडा सेक्टर १२६ मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पत्नीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला असून तपास केला जात आहे. अधिक तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल.

बिंद्राविरुद्ध नोएडा पोलिस ठाण्यात त्याचा मेहुणा वैभवने तक्रार दिली होती. यात वैभवने म्हटलं की, बहिणीचं लग्न ६ डिसेंबरला विवेक बिंद्रासोबत ललित मानगर हॉटेलमध्ये झालं होतं. दोघेही वेस्ट रेसिडन्सीमध्ये राहतात. विवेकचा पत्नीला मारहाणीचा व्हिडीओसुद्धा समोर आल्याचं म्हटलं जात आहे.

बहिणीला इतकं मारलं की तिला कानाने ऐकू येत नसल्याचंही वैभवने म्हटलं. इतकंच नाही तर तिचे केस धरून ओढल्याने डोक्यालाही दुखापत झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असून विवेकने यानिकाचा मोबाईलसुद्धा फोडल्याचा आरोप वैभवने केला आहे.