मुंबईत जिथे होर्डिंग दुर्घटना झाली तिथेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होत आहे. घटनेला दोन दिसत होत नाहीत, तोच ते रोड शो करायला येत आहेत.मोदी घटनास्थळी गेले तरी ते मगरीचे अश्रू ढाळणारे, नौटंकी करणारे व्यक्ती आहेत. पंतप्रधान मोदी यांना राज्यात रोड शो करण्याची गरज भासते म्हणजे राज्यात महाविकास आघाडीने आणि देशात इंडिया आघाडीने पंतप्रधान मोदी यांना रस्त्यावर आणले आहे. गल्लोगल्ली, रस्तोरस्ती भाजपवाले पंतप्रधानांना फिरवत आहेत. त्यांना पराभवाची भीती वाटत असल्यानेच पंतप्रधानांवर रस्त्यांवर रोड शो करण्याची वेळ आली आहे.
महाविकास आघाडी मुंबईत 6 जागा लढवत आहे. या सहाच्या सहा जागा जिंकण्याचा आमचा निश्चय आहे. मोदींना मुंबईत ठाण मांडून बसावे लागत आहे. त्यांच्यावर दारोदार फिरण्याची, रोड शो करण्याची वेळ का आली, याबाबत त्यांनी जनतेला उत्तर द्यावे. मोदी आज नाशिक, त्यानंतर कल्याण त्यानंतर रोड शो करणार आहेत. पंतप्रधानांना देशभरात रोड शो का करावे लागत आहेत. त्यांना दुसरे काम नाही काय, असा रोखठोक सवालही त्यांनी केला.
पंतप्रधान मोदी कधीही मणीपूरला गेले नाहीत, जम्मू कश्मीरमध्ये कश्मीरी पंडितांचे अश्रू पुसण्यासाठी गेले नाहीत. घाटकोपरमध्ये दुर्घटना झाली, त्याबाबत त्यांना संवेदना नाहीत काय, असेही संजय राऊत यांनी विचारले. आज तेथे जाऊन नेहमीप्रमाणे अश्रू ढाळण्याची नौटंकी ते करतील, असेही ते म्हणाले. मुंबईत आणि महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी मोदी जाणार आहेत, तिथे भाजपचा पराभव निश्चित आहे, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या जनतेने निर्णय घेतला आहे. भाजप किंवा मिंधे, अजित पवार गटाचा कोण उमेदवार आहे, ते जनता बघत नाही. मोदी नको, मोदी गो बॅक असे जनतेने ठरवले आहे. मोदी गो बॅकचे नारे गावागावात घुमत आहे, असेही संजय राऊत यांनी ठणकावले.
काशीमध्ये भव्य मंदिर होण्यासाठी बहुमत गरजेचे आहे, असे वक्तव्य आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याचाही संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. आसाममध्ये भाजपच्या किती जागा कमी होत आहेत, याबाबत तेथील मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी बोलावे. काशी, मथुरेत काय करायचे, हे जनता ठरवेल. तसेच मथुरेत भाजपच्या उमेदवार हेमा मालिनी यांचा पराभव निश्चित आहे, असेही संजय राऊत म्हणाले.