इंग्रजीच्या पेपरमध्ये प्रश्नाऐवजी चक्क छापून आलं उत्तर; एक्सट्रा मार्क्स मिळणार का? 

मुंबई, 21 फेब्रुवारी: आज पासून महाराष्ट्र स्टेट बोर्डाची बारावीसाबी परीक्षा सुरु झाली. आज पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर घेण्यात आला. मात्र या पेपरमध्ये प्रश्नपत्रिकेत मोठी चूक झाल्याचं निदर्शनास आलं आहे.

या प्रश्नपत्रिकेत एका प्रश्नऐवजी चक्क उत्तर छापून आल्याचं धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रश्नऐवजी उत्तर छापून आलेलं बघून विद्यार्थीही चकीत झाले. मात्र आता यावर बोर्डाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. इयत्ता 12वी आजच्या इंग्रजी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत Q3 च्या A3 to A5 या क्रमांकाच्या प्रश्नाऐवजी उत्तर छापलं गेलं.

हे बघून विद्यार्थीही काहीसे चक्रावून गेले. मात्र विद्यार्थ्यांच्या आणि बोर्डाच्या ही बाब लगेच लक्षात आली. बोर्डाने प्रथमदर्शनी चूक मान्य केली आहे. पण नियामकाचा अहवाल आल्यानंतर ज्यांनी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला त्यांनाच ग्रेस मार्क देण्याचा निर्णय होईल अशी माहिती देण्यास आली आहे.

तसंच बोर्डाकडून याबाबत खुलासा करण्यात आला असून त्रुटींबाबत योग्य निर्णय जाहीर केला जाईल असं स्पष्टीकरण बोर्डाने जाहीर केलं आहे.

मात्र बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये चूक होण्याचं हे काही पहिलं उदाहरण नाही, या आधीही अनेक वर्षी बोर्डाच्या प्रशपत्रिकांमध्ये त्रुटी आढळल्या आहे. मात्र यंदा पहिल्याच पेपरमध्ये अशी चूक झाल्यामुळे सर्वच चक्रावले आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संपावर असल्यामुळे ही बोर्डाची संयुक्त सभा होऊ शकली नव्हती. मात्र आता इंग्रजी पेपरच्या त्रुटीवर चर्चा करण्यासाठी पुन्हा संयुक्त सभा आयोजित करण्यात येणार आहे. यानंतर विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नाबाबत योग्य तो न्याय देण्यात येईल असं बोर्डाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हंटल आहे.