भारत सरकारने पाकिस्तानवरील धडक कारवाईनंतर आता देशांतर्गत सुरक्षेचा नवा अध्याय सुरू केला आहे. भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर गुजरात, पंजाब, राजस्थान आणि जम्मू-काश्मीर या पाकिस्तान सीमेवरील राज्यांतील जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण मॉक ड्रिल्स गुरुवारी संध्याकाळी आयोजित केल्या जात आहेत.
ही भारतातील 1971 युद्धानंतरची पहिली मोठ्या प्रमाणावर नागरी सराव मोहीम आहे. 7 मे रोजी झालेल्या पहिल्या मॉक ड्रिलच्या रात्रीच भारतीय लष्कराने पाकिस्तानातील बहावलपूर, मुरिदके आणि मुजफ्फराबाद येथील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले.
तीन महत्त्वाचे उद्देश साध्य
या लष्करी कारवाईमुळे भारताने तीन प्रमुख उद्दिष्टे साध्य केली:
-
लष्करी उद्देश:
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं की दहशतवाद्यांना “धुळीला मिळवणं” हा मुख्य उद्देश होता. बहावलपूर, मुरिदके व मुजफ्फराबादमधील दहशतवादी ठिकाणे पूर्णतः उद्ध्वस्त करण्यात आली. -
राजकीय उद्देश:
पाकिस्तानला दहशतवाद्यांना मदत करण्याची किंमत वाढवण्याचा इशारा देण्यात आला. त्याचबरोबर ‘इंडस वॉटर ट्रिटी’ तात्पुरती निलंबित करण्यात आली असून, ती पाकिस्तानने दहशतवाद थांबवल्यावरच पुन्हा सुरू होईल. -
मानसिक उद्देश:
भारताने जगाला ठाम संदेश दिला की, आता कोणतीही जागा सुरक्षित नाही. दहशतवादी पाकिस्तानातही असतील तर त्यांच्यावर हल्ला केला जाईल.
नागरी संरक्षण मॉक ड्रिल्स – भारताची नविन पॉलिसी
या मॉक ड्रिल्समुळे भारत-पाक संबंधात एक मोठा बदल घडला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारताने आता स्पष्ट केले आहे की, नियंत्रण रेषा (LoC) किंवा अणुशस्त्रांचा धोका याचा दहशतवादासाठी वापर होऊ देणार नाही. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी लष्कराला आदेश दिले होते की, प्रत्येक गोळीला गोळ्याने उत्तर दिलं जाईल.
या पार्श्वभूमीवर नागरी संरक्षण विभाग, लष्कर, पोलीस, आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने ही सराव मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये नागरिकांना सुरक्षिततेच्या उपाययोजना, आपत्कालीन प्रतिसाद, बंकर वापर, आणि संवाद यंत्रणा यांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
हवाई हल्ले: पाकिस्तानच्या लष्करी तळांना लक्ष्य
भारतीय हवाई दलाचे संचालक एअर मार्शल ए.के. भारती यांनी नुकत्याच दिलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, पाकिस्तानी लष्कराच्या हवाई तळांवर अचूक हल्ले करण्यात आले. पाककडून सातत्याने ड्रोनद्वारे भारतात लष्करी व नागरी ठिकाणांवर हल्ले होत असल्याने हे पाऊल उचलले गेले.
भारती यांनी ‘बिफोर-आणि-आफ्टर’ सॅटेलाईट प्रतिमा दाखवत सांगितले की, सरगोधा (F-16 ची तळ), स्कार्दू, जेकबाबाद, भोलारी, सुक्कुर आणि रहीम यार खान येथील तळांवर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
“आपली लढाई फक्त दहशतवाद्यांशी होती, पण पाकिस्तानच्या लष्करानेच सीमोल्लंघन केलं,” असे भारती म्हणाले.
जागतिक स्तरावर भारताचा संदेश
22 एप्रिल रोजी सौदी अरेबियामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारताची भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर 1 मे रोजी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे सिनेटर मार्को रुबियो यांना भारताच्या कारवाईबद्दल माहिती दिली होती.
ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही
सध्या मोठ्या प्रमाणातील हिंसाचार थांबला असला तरी ऑपरेशन सिंदूरचे उद्दिष्ट पूर्णतः साध्य झालेले नाही. इंडस वॉटर ट्रिटी अद्यापही निलंबितच असून, पाकिस्तानने दहशतवादाला समर्थन देणे थांबवल्याशिवाय ती पुन्हा सुरु होणार नाही.