लोकसभेच्या मैदानात किती उमेदवार रिंगणात पहा ! जळगावसाठी चौदा तर रावेरात चोवीस उमेदवार : प्रचाराला येणार वेग

जळगाव – : जळगावसह रावेर लोकसभा निवडणुकीसाठी माघारीच्या अंतिम दिवशी दोघा मतदारसंघात एकूण 38 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघात सहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली तर रावेरातून पाच अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे. जळगाव लोकसभेत 14 तर रावेरात 24 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून आता प्रचाराला वेग येणार आहे.

सध्या जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला आहे. दि. 13 मे रोजी जळगाव आणि रावेरमधील निवडणूक पार पडणार आहे.

जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. माघारीच्या अंतिम दिवशी जळगावमधून सहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे. यानंतर आता जळगाव लोकसभेत भाजपच्या स्मिता वाघ, शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार यांच्यासह एकूण 14 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जळगाव लोकसभेतून संजय एकनाथ माळी, रोहित दिलीप निकम, लक्ष्मण गंगाराम पाटील, डॉ.प्रमोद हेमराज पाटील, संग्रामसिंह सुरेश सूर्यवंशी व प्रदीप शंकर आव्हाड या अपक्ष सहा उमेदवारांनी माघार घेतली आहे. दुसरीकडे रावेर लोकसभेमधून पाच उमेदवारांनी माघारी घेतली आहे. यामुळे आता येथून भाजप उमेदवार रक्षा खडसे, महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील व वंचित बहुजन आघाडीचे संजय ब्राह्मणे यांच्यासह एकूण 24 उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघातून शेख रहुब युसुफ, राहुल रॉय, अशोक मूळे, नितीन प्रल्हाद कांडेलकर, शेख कुर्बान शेख करीम नाजमीन शेख रमजान या पाच अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आहे.

प्रचाराला येणार वेग

माघार नंतर जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले असून प्रमुख पक्षांचे वरिष्ठ नेत्यांच्या प्रचार सभांचे नियोजन सुरु झाले असून प्रचाराला वेग येणार आहे. भाजपतर्फे जोरदार प्रचार करण्यावर भर देण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या सभांचे नियोजन सुरु झाले आहे.