दिल्ली – मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात आरोप झाल्यानंतर ईडीच्या कोठडीत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी जेलमधून पहिला आदेश जारी केला होता.
त्यांनी कोठडीतून सरकारचं कामकाज सुरु केल्याने आश्चर्य व्यक्त होतंय. मात्र आतमध्ये कसल्याही सुविधा उपलब्ध नसताना त्यांनी नेमका आदेश कसा काढला? याबाबत चर्चा होत आहेत.
नेमका आदेश काय?
दिल्लीच्या काही भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे, त्यावर तोडगा काढावा, असे आदेश केजरीवाल यांनी पाणीपुरवठा मंत्री आतिशी यांना दिले. यावर आतिशी यांनी पत्रकार परिषद आयोजित करत केजरीवाल यांना अटक झाली असली तरी दिल्लीकरांचे कोणतेही काम अडणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली. केजरीवाल यांनी दिल्लीच्या लोकांचे हित लक्षात घेऊन आदेश दिला. हा आदेश पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात अश्रू आले, असेही त्या म्हणाल्या होत्या.
एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं की, ईडीने हे आदेशाचं प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे. याची चौकशीसुद्धा होऊ शकते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याजवळ कागद आणि कम्प्युटर कुठून आलं? कारण ऑर्डरची कॉपी कम्प्युटरवर टाईप झालेली असून प्रिंटेड आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे सुविधा नेमक्या आल्या कुठून? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अरविंद केजरीवाल हे २८ मार्चपर्यंत ईडी कोठडीमध्ये असणार आहेत. ईडीकडून या प्रकरणी चौकशी केली जाऊ शकते.
काय म्हणाल्या होत्या आतिशी?
पाणी आणि स्वच्छतेसारख्या छोट्या-छोट्या गोष्टींबाबत कोठडीत असलेला कोणता मुख्यमंत्री विचार करू शकतो, असे सांगून आतिशी पुढे म्हणाल्या की, मुख्यमंत्री केजरीवाल हे दोन कोटी दिल्लीकर लोकांना आपले कुटुंब मानतात. दिल्लीकरांसाठी केजरीवाल हे केवळ एक मुख्यमंत्री नाहीत तर ते त्यांच्या कुटुंबाचे सदस्य आहेत.
दरम्यान, केजरीवाल यांच्या अटकेनंतर निर्माण झालेल्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी आप नेत्यांनी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. पक्षाचे सचिव संदीप पाठक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
दरम्यान, शनिवारी संध्याकाळी केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल त्यांना भेटायला गेल्या होत्या. परतत असताना त्यांच्या हातात कागद दिसला होता. त्यांनीच ‘तो’ आदेश मंत्री आतिशी यांच्यापर्यंत पोहोचवला, असंही सांगितलं जात आहे.