अरे देवा! ३ वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा CM शिंदेंच्या जाहिरातीत फोटो; कुटुंबीय चक्रावले, दर्शन घडवण्याची मागणी केली

नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये शिंदे सरकारकडून ‘मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजने’ची घोषणा करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकार देवदर्शन घडवणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या खास योजनेची चर्चा सुरू असतानाच आता वेगळच प्रकरण समोर आले आहे. तीन वर्षांपासून घरातून बेपत्ता असलेली व्यक्ती या योजनेच्या जाहिरातीवर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो “आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन” या मुख्यमंत्र्यांच्या जाहिरात फलकावर दिसल्याने त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ज्ञानेश्वर विष्णू तांबे असे या व्यक्तीचे नाव आहे.

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील वरूडे येथील ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे गेले तीन वर्षापासून बेपत्ता आहेत. त्यांच्या कुटुंबाने सर्वत्र शोध घेतला परंतु ज्ञानेश्वर तांबे मिळून आले नाहीत. अशातच तीन वर्षानंतर मुख्यमंत्र्यांच्या “आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन” या जाहिरात फलकावर ज्ञानेश्वर तांबे यांचा फोटो दिसल्याने कुटुंबाला धक्काच बसला आहे.

याबाबत ज्ञानेश्वर तांबे यांचे चिरंजीव भरत ज्ञानेश्वर तांबे यांनी सांगितले की, “आमचे वडील गेले तीन वर्षापासून हरवले होते. आम्ही त्यांचा सर्वत्र शोध घेत होतो परंतु ते सापडत नव्हते. आता त्यांचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत दिसून आल्याने आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला आहे, मुख्यमंत्री ज्याप्रमाणे जेष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळाचे दर्शन घडवणार आहे त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या वडिलांचे दर्शन घडून द्यावे,” ही विनंती केली आहे.

 

ताजा खबरें