साकळीत जोरदार पाऊस शेतकरीराजा सुखावला

साकळी – परिसराला गेल्या एका महिन्यापासून प्रतीक्षा असलेला पावसाचे काल दि.५ रोजी जोरदारपणे हजेरी लावली. रात्रभर जोरदार पावसाच्या सरी कोसळल्यामुळे परिसर सुखावला असून वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे.या आलेल्या पावसामुळे शेतकरी राजा सुखावला आहे.तर पावसामुळे साकळी बसस्टँड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. त्यामुळे नागरिकांची वापरताना अडचण होत आहे.अजूनही परिसराला पावसाची गरज आहे

याबाबत सविस्तर असे की,यंदाच्या वर्षी जून महिना संपला तरी पाऊस यायचे नाव घेत नव्हता.ढग आले की ते निघून जायचे.त्याचप्रमाणे दिवसभर कडक ऊन तापत असल्याने उन्हाचे सुद्धा मोठे चटके जाणवत होते व वातावरणात गर्मीचे प्रमाणही वाढले होते.त्यामुळे या उन्हाचा व गर्मीचा नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत होता.तर शेतातील पीक पाणी धोक्यात आलेले होते.तर येत्या दोन-चार दिवसात पाऊस आला नसता तर ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली होती त्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आलेले होते. पावसाअभावी सर्वत्र उदासीनता जाणवत होती.शेतीव्यवसाय धोक्यात आलेला होता.

दरम्यान दि.५ रोजी सायंकाळपासूनच पावसाने साकळीसह परिसरात दमदारपणे हजेरी लावली.अवघ्या अर्ध्या ते पाऊण तासात पावसाचे पाणी रस्त्यावरून अक्षरशः वाहू लागले होते.या पावसाने रात्रभर हजेरी लावली. रात्री अधून-मधून जोरदारपणे पावसाच्या सरी कोसळत होत्या.पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.सकाळपासूनच शेतकऱ्यांनी शेतात जाऊन शेती कामांना सुरुवात केली.पावसाअभावी ज्या पेरण्या खोळंबिल्या होत्या त्या आता केल्या जातील असे आशादायी चित्र निर्माण झालेले आहे.आजच्या जोरदार पावसामुळे शेतकरी वर्ग चांगलाच सुखावला आहे.तर वातावरणात सुद्धा अल्हाददायक गारवा निर्माण झालेला आहे. त्याचप्रमाणे पावसामुळे गावात मुख्य चौकाच्या ठिकाणी गुडघाभर पावसाचे पाणी वाहू लागल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळवर झाली.या पाण्यातून नागरिक कसे बसे वाट काढीत होते.मुख्य चौकात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी येण्याची व त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास ही बाब नेहमीची बनली आहे.या समस्येवर मार्ग काढण्यासाठी प्रशासन सुद्धा अपयशी ठरत आहे.

बस स्टँड रस्त्यावर पाण्याचा तलाव -साकळी गाव ते बस स्टॅन्ड पर्यंत असलेला रस्ता हा परिसराचा वापराचा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरून शाळाकरी मुले, प्रवासी तसेच संपूर्ण परिसरातील नागरिकांचा मुख्य वापर आहे. हा रस्ता साकळी गावाचे नाक आहे.दरम्यान दर पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत असते. त्यामुळे नागरिकांच्या वापरास मोठी अडचण निर्माण होत असते. या ठिकाणी अनेक वाहनधारकांचे अपघात सुद्धा होत असतात. दरमान काल रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी तुंबले होते. या तुंबलेल्या पाण्यातून वापरणारे नागरिक कसे-बसे रस्ता काढीत होते.या रस्त्याच्या समस्ये बाबत प्रशासनाला जाणीव आहे मात्र या समस्येवर प्रशासनाकडून केव्हा मार्ग काढला जाणार? अथवा कोण्या एखाद्याचा जीव गेल्यानंतर या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार का? या रस्त्याच्या समस्येकडे अनेकांच्या तक्रारी असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष का होत आहे? संतप्त सवाल नागरिक व्यक्त करीत आहे. प्रशासनाकडून या रस्त्याच्या समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविला जावा अशी मागणी परिसर वासायांकडून केली जात आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh