राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर तीन टक्के, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती

मुंबई – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून रुग्णवाढीचा दर सुमारे तीन टक्के इतका आहे. एच1एन1, एच3एन3 आणि एन्फ्यूएन्जा रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर, राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत दिली. दरम्यान, नागरिकांनी बुस्टर डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

राज्यात कोरोना, एच1एन1, एच3एन3 आणि एन्फ्यूएन्जा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने निवेदन करावे, अशी सूचना उपसभापती नीलम गोऱहे यांनी राज्य शासनाला केली होती. त्यानुसार आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील रुग्ण संख्या आणि उपाययोजनांबाबतची माहिती परिषदेत दिली. राज्यात आतापर्यंत एच1एन1 बाधितांची संख्या 405 इतकी आहे. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे तर एच3एन2 बाधित रग्णांची संख्या 195 असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधितांची संख्या 1 हजार 308 इतकी आहे. राज्यात सध्या हंगामी साथीच्या आजाराची लक्षणेही रुग्णांमध्ये दिसत आहेत.

वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

वाढत्या रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱयांची आढावा बैठक घेतली. जनजागृतीबरोबरच राज्यात 4 हजारपेक्षा जास्त वैद्यकीय अधिकाऱयांना पुन्हा प्रशिक्षण देण्यात आले आहे. गंभीर, आजारी, वृध्द, यांना आरोग्य कर्मचारी यांना मोफत लसीकरण केले आहे. प्रत्येक जिह्यांचे सर्वेक्षण आणि लसीकरण, बूस्टर डोस देण्यासाठी प्रवृत्त करावे, असे आदेश दिले आहेत. लस घेण्यासाठी स्थानिक पातळीवर निधी वितरीत केला आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

ऑक्सिजनचा पुरेसा साठा

राज्यात 523 ऑक्सिजन प्लांट असून 552 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती केली जाऊ शकते. 370 एमएलडी लिक्विड ऑक्सिजन टॅंक, 56 हजार 551 जम्बो सिलिंडर, 20 हजार छोटे सिलिंडर्स, 1 हजार डयुरा सिलिंडर्स आहेत. उपचारांसाठी 1 हजार 588 कोरोना रुग्णालये आहेत. विलगीकरण खाटा 51 हजार 365, ऑक्सिजन बेड 49 हजार 396, आयसीयू बेड 14 हजार 395 तर व्हेटींलेटर बेड 9 हजार 236 आहेत.

ताजा खबरें