९९ टक्के गुण मिळविले. अवघ्या एका चहाच्या कपमुळे भंगले डॉक्टर होण्याचे स्वप्न. आता हायकोर्ट देणार न्याय

राजस्थानातील एका विद्यार्थिनीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न केवळ एका चहाच्या कपामुळे भंगले आहे. हे ऐकन तुम्हालाही विचित्र वाटले ना. पण हे खरे आहे.

९९ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या आणि अतिशय हुशार असलेल्या या विद्यार्थिनीला आता न्यायाची अपेक्षा आहे. हा नेमका प्रकार काय आहे ते आता जाणून घेऊया.

जयपूरच्या बस्सी शहरातील १८ वर्षीय NEET विद्यार्थिनी दिशा शर्मा असे तिचे नाव आहे. तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते, परीक्षकाच्या चुकीमुळे ते अपूर्ण राहिले. पेपर सुरू असताना निरीक्षकाच्या हातातून चहाचा कप निटसला आणि दिशाच्या ओएमआर शीटवर पडला. या गरम चहाने तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. दिशाने अनेक विनवण्या केल्या, मात्र तिचे कोणीही ऐकले नाही. अखेर आता दिशाने राजस्थान हायकोर्टात याचिका दाखल करून न्यायाची मागणी केली आहे

डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून एनईईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या बस्सी येथील दिशा शर्माच्या गेल्या दोन वर्षांपासून घेतलेल्या मेहनतीवर चहा पडला आहे. प्रश्नांची उत्तरे लिहिलेले ओएमआर शीट डागाळले. अभ्यासाचे आणि परीक्षेच्या तयारीचे रोजचे तास तिच्या डोळ्यासमोर क्षणार्धात वाहून गेले.

नेमकं काय घडलं

नीट परीक्षा ७ मे २०२३ रोजी झाली. दिशाचे परीक्षा केंद्र जयपूरच्या रामनगरिया भागातील विवेक टेक्नो स्कूलमध्ये आले आणि परीक्षा दुपारी २ वाजता सुरू झाली. सुमारे दीड तास उलटून गेला. दिशाने जवळपास अर्धा पेपर सोडवला आणि त्याची उत्तरे ओएमआर शीटमध्ये लिहीली. त्याचवेळी अचानक दिशाला तिच्या हातावर आणि ओएमआर शीटवर चहा सांडलेला दिसला. परीक्षा हॉलमध्ये पर्यवेक्षक आले होते आणि ते चहा पितच परीक्षा हॉलची

पाहणी करत होते. त्यांच्या हातातून चहाचा भरलेला कप खाली पडला. आणि तो दिशा शर्माचा हात, तिची ओएमआर शीट आणि बेंचवर पडला.

चहा टाकून पर्यवेक्षक परीक्षा कक्षाच्या बाहेर आले. घाबरलेल्या अवस्थेत दिशाने हळूहळू ओएमआर शीटवर सांडलेला चहा मास्कने साफ करायला सुरुवात केली. यादरम्यान ओएमआर शीटची काही उत्तरेही खोडण्यात आली आणि चहाच्या डागामुळे ओएमआर शीट खराब झाली. काही वेळाने पर्यवेक्षक हातात कुठून तरी कापड घेऊन परीक्षा हॉलमध्ये परतले. आणि ओएमआर शीट साफ करण्यास सांगितले. पर्यवेक्षकाने दिशाला सांगितले की, फार काही झाले नाही. तू तुझा पेपर पूर्ण कर. या सगळ्यात बराच वेळ वाया गेला, अनेक प्रश्न अनुत्तरीतच राहिले. वेळ संपल्यावर अतिरिक्त वेळही दिला गेला नाही.

दिशा म्हणते.

दिशा शर्माने सांगितले की, जेव्हा मी परीक्षा केंद्रावरील निरिक्षकांना सांगितले की, चहा सांडल्यामुळे माझ्या परीक्षेचा बराच वेळ वाया गेला, तेव्हा त्यांनी तुम्हाला अतिरिक्त वेळ देण्याचे आश्वासन दिले. मी पुन्हा पेपर सोडवण्यात व्यस्त झाले. तेव्हा परीक्षेची वेळ संपली आणि बेल वाजली. माझा केमिस्ट्रीचा पेपर जवळपास ३३ टक्के सोडवायचा होता. मी पर्यवेक्षकाला फक्त ५ मिनिटे अतिरिक्त वेळ मागितला, पण त्यांनी माझ्याकडून ओएमआर शीट हिसकावून घेतली. माझे १७ प्रश्न राहून गेले. मला सर्व उत्तरे येत होती. पण इच्छा असूनही पूर्ण करू शकलो नाही.

प्राचार्यांकडे गेले

दिशाने सांगितले की, परीक्षा संपल्यानंतर मी तक्रार घेऊन प्राचार्यांकडे गेले. संपूर्ण घटना सांगितली. तेव्हा प्राचार्यांनी मला अर्धा तास त्यांच्या खोलीत बसवून ठेवले. आणि नंतर मला निघून जाण्यास सांगितले. आरडाओरडा होऊ नये म्हणून प्राचार्य थांबले आणि बाकीचे विद्यार्थी आणि पालक निघून गेले. मग मी एकटी पडले आणि रडत घरी पोहोचले.

हायकोर्टात धाव

दिशा आणि तिच्या कुटुंबीयांना कुठेही दिलासा मिळाला नाही. अखेर त्यांनी अधिवक्ता रघुनंदन शर्मा यांच्या मदतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. हे संपूर्ण प्रकरण अतिशय गांभीर्याने घेत न्यायमूर्ती एमएम श्रीवास्तव आणि न्यायमूर्ती अनिल उपमन यांच्या खंडपीठाने दिशाचे मूळ ओएमआर शीट आणि एनटीएकडून संपूर्ण रेकॉर्ड मागवले आहे. परीक्षा केंद्रापासून ते वर्ग खोलीपर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेजसह शाळेच्या

प्राचार्यांना ४ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.