टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची धुरा सांभाळणारा हार्दिक पंड्या याच्या सावत्र भावाला अटक करण्यात आली आहे. हार्दिक आणि कृणाल या पंड्या बंधुंची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वैभव पंड्या याला बेड्या ठोकल्या आहेत. वैभववर पंड्या बंधुंची तब्बल 4.3 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
Vaibhav Pandya हा हार्दिक आणि कृणाल यांचा सावत्र भाऊ आहे. या तिघांनी 2021मध्ये पॉलिमर बिजनेसची एक कंपनी सुरू केली होती. या कंपनीत Hardik Pandya आणि Krunal Pandya यांची प्रत्येकी 40 टक्के, तर वैभव याची 20 टक्के भागिदारी होती. कंपनीला होणारा नफा तिघांमध्ये वाटला जाईल असा करार झाला होता.
परंतु झालेल्या नफ्याचा हिस्सा हार्दिक आणि कृणालला देण्याऐवजी वैभवने नवीन कंपनी स्थापन केली आणि त्यात नफ्याची रक्कम ट्रान्सफर केली. यामुळे पंड्या बंधुंचे जवळपास 3 कोटी रुपयांचे नुकसान झाले. तसेच वैभवने आपली भागिदारी 20 टक्क्यांवरून 33.33 टक्क्यांवर नेल्याने पंड्या बंधुंना आणखी आर्थिक फटका बसला.
वैभवने कराराचे उल्लंघन केल्याने पंड्या बंधुंना जवळपास 4.3 कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे वैभव विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
दरम्यान, हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवत असून कृणाल पंड्या लखनऊ सुपर जायंट्स संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. गेल्यावर्षी केएल राहुलच्या अनुपस्थितीत त्याने संघाचे नेतृत्वही केले होते.