‘हा’ रॅपर आहे कुठे? कायदेशीर मदतीसाठी असीम सरोदेंचा मदतीचा हात

गेल्या आठवडाभरापासून सोशल मीडियावर एक मराठी रॅप धुमाकूळ घालतंय. “चोर आले, ५० खोके घेऊन किती बघा, चोर आले, एकदम ओके होऊन” हे रॅप काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेना (ठाकरे गट) नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

हे रॅप गाणारा तरुण कलाकार राम मुंगासे एका रात्रीत स्टार झाला. परंतु हे रॅप व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.

राम मुंगासेवर या रॅपमुळे कारवाई करण्यात आली आहे. मुळात त्याने या गाण्यात कुठेही सरकारचं, सरकारमधील नेत्यांचं नाव घेतलेलं नाही. तरीदेखील त्याच्यावर कारवाई झाली आहे असा दावा ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान, एकीकडे त्याच्या अटकेचा केवळ निषेध करणारे लोक आहेत, तर दुसऱ्या बाजूला रामच्या मदतीसाठी काहीजण पुढे आले आहेत. विधीज्ञ असीम सरोदे राम मुंगासे याची कायदेविषयक मदत करण्यासाठी पुढे आले आहेत.असीम सरोदे यांनी हे रॅप ट्विटवर रीट्विट केलं आहे. तसेच त्यांच्या ट्विटमध्ये सरोदे यांनी म्हटलं आहे की, हा रॅपर कुठे आहे? कोणत्या शहरातील आहे कृपया कळवावे. मी आणि आमची लीगल टीम (कायदेविषयक पथक) त्याला सगळी कायदेविषयक मदत देईल. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असे दाबणे अयोग्य आहे. बेकायदेशीरतेच्या वाटेवर जाणाऱ्या आताच्या सरकारला आमि नंतर कुणीही सत्तेत येईल त्यांना कायद्याचे पुस्तक दाखविण्यात येईल.

हा सरकारचा कबुलीजबाब नाही का : रोहित पवार

राम मुंगासे या कलाकाराच्या अटकेवरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला आहे. रोहित पवार यांनी याबाबत एक ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये रोहित पवार यांनी लिहिलं आहे की, “आपल्या रॅप साँगमध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख नसतानाही राम मुंगासे या तरुण कलाकाराला केवळ ५० खोके या शब्दामुळे अटक होत असेल तर हा सरकारचा कबुलीजबाबच नाही का?”

ताजा खबरें