गुलाबराव पाटलांना ‘जुलाबराव’ म्हणताच ते भडकले, कार्यकर्त्याला आईवरून शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपने जळगावात भूकंप

जळगाव – राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील एका कथित ऑडिओ क्लिपमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. एका कार्यकर्त्यासोबतची पाटील यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

त्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाद घालताना कार्यकर्त्याने गुलाबरावांना जुलाबराव म्हटलं. त्यामुळे गुलाबराव चांगलेच भडकले. त्यांनी थेट कार्यकर्त्याला आईवरून शिवीगाळ करत त्याचा उद्धार केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे जळगावात एकच खळबळ उडाली आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात गुलाबरावांची ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून त्याची चर्चा आहे. मात्र, टीव्ही9 मराठी या कथित ऑडिओ क्लिपला कोणताही दुजोरा देत नाही.

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची मराठा आरक्षणाच्या विषयावरून एका कार्यकर्त्यासोबत बोलतानाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये कार्यकर्त्याकडून मंत्री गुलाबराव पाटील यांना मराठा आरक्षणासंदर्भात आक्रमक भूमिका मांडण्याची मागणी करण्यात आली. त्यावरून वादावादी होताच कार्यकर्त्याने गुलाबरावांचा उल्लेख गुलाबराव ऐवजी जुलाबराव असा केला. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील चांगलेच भडकले.

कार्यकर्त्याकडूनही शिवीगाळ

त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी या कार्यकर्त्याला अश्लील शिवीगाळ केली. तसेच त्याला आईवरूनही शिवीगाळ केली. गुलाबरावांनी शिवीगाळ केल्यावर कार्यकर्त्याकडूनही गुलाबराव पाटलांना अश्लील शिवीगाळ करण्यात आल्याचं या कथित ऑडिओ क्लिपमध्ये दिसतं. संबंधित कार्यकर्ता आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील संभाषणाची ही कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

तिघांविरोधात गुन्हा दाखल

व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये दोघांचेही फोटो दिसत आहेत. फोटो असलेल्या कार्यकर्त्याचे नाव रमेश पाटील आहे. तर दुसऱ्या बाजूने मंत्री गुलाबराव पाटील यांचा फोटो दिसत आहे. दरम्यान ऑडिओ क्लिपवरून जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये बोलणाऱ्या औरंगाबाद येथील व्यक्तीसह ती ऑडिओ क्लिप व्हायरल करणारे धरणगाव येथील दोन जण अशा तिघांविरुद्ध काल धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.जीवे मारण्याची धमकी

दरम्यान, या प्रकरणानंतर संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये बोलणाऱ्या कार्यकर्त्या सोबत फोनवरून संपर्क साधण्यात आला. त्यावर त्याने ती क्लिप माझीच असल्याचं स्पष्ट केलं. मात्र आता मला गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्या विरोधात औरंगाबाद येथील पोलीस ठाण्यात तक्रार देणार असण्याची माहिती त्यांनी दिली.

jalgaonsandesh

jalgaonsandesh