जळगाव जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडणार – मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाने दांडी मारली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा अधून मधून पाऊस पडत आहे. मात्र शेती पिकांसाठी चांगल्या पावसाची गरज आहे. पण पाऊस नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. कारण पाण्याअभावी अनेक ठिकाणी पिकांनी माना टाकल्या आहे. जळगाव जिल्ह्यात देखील अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पडण्यासंदर्भात पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. तसेच याबाबत मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाल्याचे देखील पाटील म्हणाले.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी टँकरही सुरु करण्यात आले आहेत. तर भविष्यातील परिस्थिती लक्षात घेता विहिरी अधिकृत करण्यासह विविध उपाययोजना सुद्धा करण्यात येत आहेत. पाऊस पडावा यासाठी आपण देवाला प्रार्थना करु. तसेच गेल्या दीड ते दोन महिन्यापूर्वी मी स्वतः.. कॅबिनेटच्या बैठकीमध्ये कृत्रिम पाऊस पडण्याबाबत प्रश्न मांडला असल्याचे पाटील म्हणाले.

कृत्रिम पाऊस पडताना पोषक वातावरण असावे लागते. टेक्निकल अडचण येऊ नये म्हणून पोषक वातावरण नसल्यावर कृत्रिम पाऊस पडण्याबाबत शासनाच्या चर्चेनंतर निर्णय घेतला जाईल अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. राज्यात अनेक भागात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत असून अनेक पिकांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पडण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. पोषक वातावरण असल्यावर कृत्रिम पावसाबाबतचा शास्रज्ञांशी चर्चा सुरु असून त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे गुलाबराव पाटील म्हणाले.