जळगाव – जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील आठवर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या आरोपीचे घर दोन दिवसात पाडण्यात येईल, याबाबत आपण जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना आदेश दिले असल्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जमावासमोर केली.
यामुळे आता मध्य प्रदेशातील आणि उत्तर प्रदेशातील बुलडोझर पॅटर्न महाराष्ट्रात येणार आहे.
गोडंगाव येथील घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी जिल्ह्यातील धरणगाव येथे विविध संघटना व नागरिकांतर्फे मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चाला संबोधित करतांना गुलाबराव पाटील म्हणाले, पूर्वी आपण ऐकत होतो गावात राक्षस येतात. मात्र, आजही असे नराधम राक्षस जिंवत आहेत. या घटनेचा निषेध कराल तेवढा थोडाच आहे. मुलगी केवळ त्या आईवडिलांची नाही तर ती आपली सर्वाची आहे.
त्यामुळे या घटनेचा जलदगती न्यायालयात खटला चालवून एक महिन्याच्या आत निकाल लावण्यात येईल. तसेच त्या नराधम आरोपीचे घर दोन दिवसात पाडण्यात येईल याबाबत आपण जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांना आदेश दिले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. शासनाचा प्रतिनिधी म्हणून नव्हे तर एक बाप म्हणून आपण एवढेच सांगतो, त्या नराधमाला फाशीची शिक्षा होईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही.
आजच्या स्थितीत आईवडिलांनीही काळजी घेण्याची गरज प्रतिपादन करून पाटील म्हणाले, मुलींनीही स्वत:संरक्षणाची तयारी ठेवली पाहिजे. या मानसिकतेचा मी आहे. कोणी आपल्यावर हल्ला केल्यानंतर मदतीची वाट पाहण्यापेक्षा आपण स्वत: आपले संरक्षण केले पाहिजे. त्यासाठी तयारी ठेवली पाहिजेस असे आवाहनही त्यांनी केले.