केंद्र सरकार कडुन स्वातंत्र्य दिनाचे गिफ्ट! टोमॅटो ५० रुपये किलोने विकण्याची सरकारची घोषणा

नवी दिल्ली – टोमॅटोच्या वाढलेल्या दरामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. टोमॅटोच्या या वाढलेल्या किमतींनी स्वयंपाकघराचे बजेट बिघडले आहे. मात्र स्वातंत्र्य दिनी सरकारने टोमॅटो स्वस्त दरात विकण्याचा निर्णय घेतला आहे.

15 ऑगस्टपासून सरकार 50 रुपये किलो दराने टोमॅटो विकणार आहे.

सध्या बाजारात टोमॅटो 70 रुपये किलो दराने विकले जात आहे. देशभरात टोमॅटोचे वाढलेले दर पाहता सरकारने १५ ऑगस्टपासून दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED) यांना १५ ऑगस्टपासून ५० रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री करण्याचे निर्देश दिले आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये टोमॅटोची किरकोळ विक्री १४ जुलैपासून सुरू झाली आहे. 13 ऑगस्टपर्यंत एनसीसीएफ आणि नाफेडने एकूण 15 लाख किलो टोमॅटोची खरेदी केली आहे.

हे टोमॅटो दिल्ली-एनसीआर, राजस्थान (जयपूर, कोटा), उत्तर प्रदेश (लखनौ, कानपूर, वाराणसी, प्रयागराज) आणि बिहार (पाटणा, मुझफ्फरपूर, आरा आणि बक्सर) येथे विकले गेले. एनसीसीएफ आणि नाफेडने खरेदी केलेले टोमॅटो सुरुवातीला 90 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करण्यात आले होते, परंतु 16 जुलैपासून त्यांची किंमत 80 रुपये प्रतिकिलोपर्यंत कमी करण्यात आली. मात्र, त्यानंतर 20 जुलैपासून 70 रुपये किलोने खरेदी सुरू झाली.

गेल्या महिनाभरात टोमॅटोच्या भावात झालेली वाढ हा चर्चेचा विषय बनला होता. देशातील विविध राज्ये आणि शहरांमध्ये टोमॅटोचे दर किलोमागे ३०० रुपयांच्या आसपास पोहोचले होते. हे लक्षात घेऊन, गेल्या 11 जुलैपासून, एनसीसीएफने देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी आणि किमती नियंत्रित करण्यासाठी अनुदानित दराने टोमॅटोची विक्री सुरू केली.