गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम)

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक परिसरातील जय बजरंग ग्रुपने मंगळवारी गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य जपण्यासाठी विविध महापुरुषांचे फोटो व महिला अत्याचार जनजागृतीचे विषयी विविध पोस्टर गावातून झळकावत सर्वांना आकर्षीत केले. सोबत जोधपूरी छत्रीच्या विविध प्रकारच्या रोषणाईने त्यात भर टाकली.

जय बजरंग ग्रुपने गणरायाची विसर्जन मिरवणूक अतिशय आगळ्यावेगळ्या प्रकारे साजरी केली. गणरायाच्या पुढे जोधपूरी छत्रीच्या विविध प्रकारच्या रोषणाईने भक्त आकर्षित झाले. गावातील विविध जाती, धर्माचे ऐक्य साधत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महाराणी अहिल्याबाई होळकर, वाल्मिकी ऋषी, महाराणा प्रताप या सारख्या महापुरुषांची फोटो लावण्यात आले होते. बस स्थानक परिसरात एलईडी वालच्या माध्यमातून जनजागृतीपर व्हिडिओ दाखवण्यात आले.

गावातून विसर्जन मिरवणुकीत विविध प्रकारचे पोस्टर प्रदर्शित करून जनजागृती केली. यात ‘तुम्ही एका रात्रीत सरकार बदलू शकतात; पण एका रात्रीत महिलांना न्याय का देऊ शकत नाही ?, महिला आहे देशाच्या प्रगतीचा आधार… करू नका त्यांच्याबद्दल वाईट विचार, स्टॉप रेप, माणुसकी मेली यासारख्या चालू घडामोडींचा समावेश होता.

आठवडाभरातील अत्याचाराचे प्रदर्शन:

यामध्ये १३ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट च्या दरम्यान आठवडाभरातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचा समावेश होता. यामध्ये १३ ऑगस्ट रोजी बदलापूर येथील घटना, १५ ऑगस्ट रोजी पुणे येथील घटना, २० ऑगस्ट रोजी अकोला, मुंबई, लातूर येथील घटना, २१ ऑगस्ट रोजी नाशिक, मुंबई , पुणे येथील घटना व २२ ऑगस्ट रोजी नागपूर व कोल्हापूर येथील घटनांचा समावेश या बॅनर मध्ये होता.

ताजा खबरें