बिहारमध्येही भाजपचा दोन उपमुख्यमंत्र्यांचा ‘फॉर्म्युला’; आज सायंकाळी 5 वाजता शपथविधी?

पाटना – बिहारमध्ये जेडीयू आणि भाजप सरकार स्थापन करणार आहे. जेडीयूसोबत सरकार स्थापन करत असल्याचा ठराव भाजपच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. यात सम्राट चौधरी यांची विधानसभा नेते पदी आणि विजय सिन्हा यांची उपनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये नितीश कुमार हे नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. तर विजय सिन्हा आणि सम्राट चौधरी यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी दिली जाणार आहे. आज सायंकाळी 5 वाजता शपथविधी कार्यक्रम होईल असं सांगण्यात आलं आहे.

नव्या सरकारमध्ये भूमिहार नेता विजय सिन्हा आणि मागास समाजाचे सम्राट चौधरी यांना उपमुख्यमंत्री पद दिलं जाणार आहे. नव्या सरकारला जीतनराम मांझी यांनी देखील पाठिंबा दिला आहे. त्यांच्याकडे चार आमदार आहेत. शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डी हे पाटण्याला रवाना झाले आहेत.

काहीच वेळात एनडीएचे आमदार राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. भाजपचे सर्व आमदार मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचत आहेत. जीतनराम मांझी आपल्या चारही आमदारांसोबत आले आहेत. नितीश कुमार यांची एनडीएचे नेते म्हणून निवड केली जाणार आहे. दोन उपमुख्यमंत्री देऊन भाजप मागास समाजाला प्रतिनिधत्व देण्याचे समीकरण साधत आहे.

नितीश कुमारांनी आज सकाळी आपल्या पदाचा राजीनामा राज्यापालांकडे सुपूर्द केला आणि महागठबंधन तुटल्याची माहिती दिली. त्यानंतर नवे सरकार स्थापन करण्याची तयारी सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमधील ही मोठ घडामोड असल्याचं बोललं जातं आहे. हा काँग्रेसला मोठा धक्का असून भाजपला उत्तर भारतात अधीक मजबुती मिळणार आहे. नितीश कुमार यांनी राजीनाम्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधल्याचं बोललं जातं.

jalgaonsandesh

jalgaonsandesh