बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार झाला आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास हल्लेखोरांनी तीन राऊंड फायर केले. गोळीबार करून हल्लेखोर पसार झाल्याचे ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी पहाटे पाचच्या सुमारास सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले असून याची माहिती मिळताच पोलिसांच्या गुन्हे शाखेने घटनास्थळी धाव घेतली. सलमानला याआधीही जीवे मारण्याच्या धमक्या मिळालेल्या असून गोळीबाराच्या घटनेनंतर त्याच्या घराबाहेर पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपसात आहे.
सलमान खान याला कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगने याआधी अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सलमानला मारणे हेच आमचे लक्ष्य असल्याचे त्याने एका मुलाखतीत जाहीरपणए सांगितले होते. याच लॉरेन्स बिश्नोईने सलमानच्या जवळचा समजला जाणारा अभिनेता व गायक गिप्पी ग्रेवाल कॅनडामध्ये हल्ला केला होता. तसेच सलमानलाही धमकीचे मेल पाठवले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेत वाढ करत त्याला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती.
दरम्यान, गेल्या वर्षी सलमान खानला एक धमकीचा मेल आला होता. सलमानचा जवळच्या प्रशांत गुजाळकर याला रोहित गर्गकडून हा धमकीचा मेल आला होता. याप्रकरणी पोलिसांनी भादवि कलम 506 (2), 120 आणि 34 अंतर्गत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित गर्ग यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता सलमानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली असून पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाले आहे. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
#WATCH | Mumbai, Maharashtra: Visuals from outside actor Salman Khan's residence in Bandra where two unidentified men opened fire this morning.
Police and forensic team present on the spot. pic.twitter.com/5vMmoXbI22
— ANI (@ANI) April 14, 2024