चिकनच्या डिशमध्ये उंदराचे पिल्लू सापडलेल्या रेस्टॉरेण्टला बंद पाडले, एफडीएने केली कारवाई

मुंबई – रविवारी वांद्रे येथील प्रसिद्ध पापा पांचो दा ढाबामध्ये एका मांसाहारी थाळीत उंदराचे पिल्लू सापडल्याने खळबळ उडाली होती. आता अन्न आणि औषध प्रशासनाने यावर कारवाईचा बडगा उगारत हे रेस्टॉरेण्ट बंद पाडले. अन्न व औषध प्रशासनाने नोटीशीमध्ये म्हंटले आहे की, जोपर्यंत खाद्यपदार्थांच्या नमुन्यांची तपासणी होत नाही तोपर्यंत रेस्टॉरंट बंद राहील.

रविवारी 13 ऑगस्ट रोजी रात्री अनुराग सिंग आणि त्याचा मित्र अमीन खान सोबत पंजाबी जेवण जेवण्यासाठी वांद्रे येथील पापा पंचो दा ढाबा  रेस्टॉरेण्टमध्ये गेले होते. दोघांनी जेवणात मटण आणि चिकन ऑर्डर केलेले. जेवायला सुरुवात करताच चिकनच्या ग्रेव्हीमध्ये अनुरागला एक विचीत्र तुकडा दिसला. त्याने तो तुकडा निरखून पाहिला त्यावेळी त्याला धक्काच बसला तो तुकडा नसून उंदराचे पिल्लू होते. त्यानंतर दोघांनी रेस्टॉरेण्टचे मॅनेजर विवियन अल्बर्ट सिकीएरा यांना बोलावून घेतले. त्यांनी त्याला तो उंदीर दाखवला आणि जाब विचारला. संतापलेल्या अनुराग यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी बुधवारी सांगितले होते की, तक्रारीवरुन रेस्टॉरेण्टचे मॅनेजर आणि शेफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. शेफ, मॅनेजर आणि चिकन पुरवठादाराविरोधात तक्रार दाखल केली असून दोन शेफ, आणि मॅनेजरला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, त्यांच्यावर अन्न भेसळ आणि ग्राहकाच्या जीवाला धोका निर्माण करणे यासारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ताजा खबरें