जळगाव – तालुक्यातील बिलवाडी येथील तरुणाला विवाह संबंधातून फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला असून दलालासह नवरी व ५ साथीदारांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज देण्यात आला आहे. याबाबत पोलीस पुढील चौकशी करीत आहे.
जळगाव तालुक्यातील बिलवाडी येथील एका ५९ वर्षीय प्रौढाने दि. १ फेब्रुवारी रोजी लेखी तक्रार दिली आहे. ते गावात त्यांच्या परिवारासह राहतात. चोपडा तालुक्यात चौगाव येथील कैलास पाटील या दलालाच्या मध्यस्थीतून तक्रारदाराच्या मुलासाठी मध्यप्रदेशातील एका तरुणीचे स्थळ आले. दोघांचा विवाह पाचोरा तालुक्यातील नांद्रे येथे तुळजा भवानी मंदिर येथे १२ नोव्हेंबर रोजी विवाह लावला. यानंतर वेळोवेळी रोख रक्कम व दागिने मिळून २ ते अडीच लाख रुपये तक्रारदाराच्या मुलाने नवरी व तिच्या नातेवाईकांना दिले आहे.
सदरहू नवरी हि विवाह झाल्यावर अडीच महिने नांदली आहे. नांदताना नवरीने घरातील सर्व कामे केली. आपुलकीने वागली. त्यानंतर ७ जानेवारी रोजी भावाच्या मुलाचा जावळाचा कार्यक्रम असल्याचे सांगून दोघेही तक्रारदारासह पती पत्नी हे चोपडा येथे गेले. त्यानंतर संशयित रामसिंग पावरा हा दुचाकी घेऊन आला. मी पुतणीला घेऊन पुढे जातो, तुम्ही दोघे दुसऱ्या दुचाकीने या म्हणत ते निघून गेले. नंतर तक्रारदार व त्यांचा मुलगा यांना सेंधवा तालुक्यातून नवरी व तिचा बनावट काका यांनी दोघांना गुंगारा देऊन पळ काढला आहे.