चाळीसगाव – तालुक्यातील वाघळी येथील दोघा भावांची शेती बारा वर्षांपेक्षा जास्त कालावधींपासून परस्परांच्या ताब्यात होती. ती शेती एकमेकांच्या नावावर झालेली नव्हती. राज्य शासनाच्या सलोखा योजनेंतर्गत आठ हेक्टर ३१ आर शेतीची अदलाबदल केवळ दोन हजार रुपयांचे मुद्रांक शुल्क भरुन झाली आहे. त्यांना २ लाख ४५ हजार १७० रुपयांची सवलत मिळाली.
सलोखा योजनेचा लाभ घेणारे ते जिल्ह्यातील पहिले शेतकरी कुटुंबीय ठरले आहेत. शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांमधील बारा वर्षांपासूनचे आपसी वाद मिटवण्यासाठी व सौहार्द वाढीस लागण्यासाठी महसूल विभागातर्फे राज्यात ‘सलोखा योजना’ राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतजमीनधारकांच्या अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क प्रत्येकी नाममात्र एक हजार रुपये आकारण्याची सवलत देण्यात येत आहे. शेतीच्या वादाबाबतचे विविध प्रकरणे न्यायालयांत वर्षानुवर्षे प्रलंबीत आहेत. मालकी हक्काबाबतचे वाद, शेताच्या बांधावरुन होणारे वाद, जमिनीच्या ताब्याबाबतचे वाद, शेतीवरील अतिक्रमणावरुन होणारे वाद, अधिकार अभिलेखातील चुकीच्या नोंदी या कारणांमुळे शेतकऱ्यांमध्ये वाद आहेत. त्यामुळे अनेक पिढ्यांचे नुकसान झालेले आहे .
असे वाद संपुष्टात येवून सलोखा निर्माण करण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. एका शेतकऱ्याच्या नावावरील शेतजमिनीचा ताबा दुसऱ्या शेतकऱ्याकडे व दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावरील शेतीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे असणाऱ्या शेतकऱ्यांचे अदलाबदल दस्तांसाठी ही सवलत देण्यात येत आहे. अकृषक, रहिवासी व वाणिज्यिक वापराच्या जमिनीसाठी ही योजना लागू नाही.
अशी झाली शेतीची अदलाबदल : वाघळी येथील रमेश एकनाथ भोळे, पोपट एकनाथ भोळे व सुरेखा पोपट भोळे यांच्यात ८ हेक्टर ३१ आर शेतीची अदलाबदल झालेली आहे. त्यासाठी नियमानुसार त्यांना शेतीच्या बाजारमूल्यानुसार दुय्यम निबंधक कार्यालयात २ लाख ४५ हजारावर मुद्रांक शुल्क तसेच दस्त नोंदणी फी भरावी लागली असती. सलोखा योजनेचा लाभ मिळाल्याने केवळ दोन हजार रुपये मुद्रांक शुल्क भरुन भोळे कुटुंबीयांत शेतीची अदलाबदल झाली आहे.