एसटी बस सवलतीमुळे महिला प्रवासी संख्या पाच हजारांनी अधिक, रिक्षा चालकांची उपासमार

जळगाव –राज्य परिवहन मंडळाने महिला प्रवाशांसाठी तिकीट भाडय़ात ५० टक्के सवलत दिल्याने जळगाव विभागात महिला प्रवाशांची संख्या सुमारे पाच हजारांनी वाढली आहे. असे असले तरी रोख उत्पन्नामध्ये घट झाल्याचे दिसून आले असून या निर्णयामुळे तीन व सहा आसनी रिक्षा चालकांवर मात्र संकट ओढवले आहे.

त्यांची उपासमार सुरू असल्याचे त्यांच्याकडून म्हटले जाते. 

राज्य परिवहन मंडळाने १६ मार्चच्या मध्यरात्रीपासून महिला प्रवाशांकरिता तिकीट भाडय़ात ५० टक्के सवलत दिली आहे. ज्या ठिकाणी खासगी सेवेद्वारे प्रवासाकरिता २० ते ४० रुपये खर्च होत होता, त्या ठिकाणी १० ते १५ रुपयांत एसटी प्रवास होऊ लागला आहे. सरकारकडून मिळणाऱ्या सवलत विचाराधीन घेतल्यास राज्य परिवहन मंडळाचा दैनंदिन दोन लाख रुपयांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.

महिला प्रवाशांनी एसटीच्या बसमधून प्रवास करण्याचे पसंत केल्याने त्याचा रिक्षाचालकांवर मोठा परिणाम झाला आहे. पूर्वी होत असलेल्या जेमतेम ४० टक्के उत्पन्न मिळत असल्याने रिक्षाचालकांसमोर इंधनाचा खर्च, वाहनांची देखभाल दुरुस्ती तसेच बँकेचा हप्ता भरण्याचे संकट उभे राहिले आहे. जळगाव या वर्दळीच्या ठिकाणी दैनंदिन धंदा हा जेमतेम ६०० रुपयांवर आल्याचे रिक्षाचालक-मालक संघटनेच्या सदस्यांकडून सांगण्यात येते. वाढलेल्या रिक्षांची संख्या तसेच एल पी जी चा इंधन म्हणून होणारा वापर यामुळे पेट्रोलवर चालणाऱ्या रिक्षाचालक आणि मालक वर्ग आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

दुपारच्या सेवा पूर्ववत करा

महिलांसाठी एसटी प्रवासात सवलत दिल्याने दुपारी तसेच कामावर व शिक्षणाच्या जाण्या-येण्याच्या वेळेत बस फेऱ्याचे नव्याने नियोजन करण्याची मागणी पुढे येत आहे. कमी भारमान असलेल्या फेऱ्या एसटीने या पूर्वी बंद केल्या होत्या. त्या पूर्ववत करण्याची मागणी महिला वर्गाकडून करण्यात येत आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh