राज्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर, अतिवृष्टीमुळे सरकारची घोषणा

राज्यातील अनेक भागात आज पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश स्थिती आहे. सतत कोसळत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता राज्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

राज्यातील आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करणेबाबतचे परीपत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली व त्यांच्या आदेशानुसार शालेय शिक्षण विभागाने आपल्या विभागाचे परीपत्रक तात्काळ जाहीर केले.

शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अनुषंगाने राज्यातील आपत्कालीन परिस्थितीत आपल्या कार्यकक्षेतील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.

हवामान खात्याच्या अंदाजावरून तसेच त्या-त्या भागातील पावसाच्या सद्यस्थितीचा व त्या अनुषंगाने स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन आपल्या कार्यकक्षेतील/स्थानिक क्षेत्रातील शाळांना सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने सुट्टी जाहीर करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.