दिवाळीच्या आजपासून सुट्या; २२ नोव्हेंबरला भरतील शाळा

सहामाही परीक्षा संपल्यानंतर आता उद्यापासून (ता. ८) शाळांना दिवाळीच्या सुट्या असतील. शासकीय सुट्यांच्या यादीनुसार २२ नोव्हेंबरला शाळा सुरू होतील, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी स्पष्ट केले आहे.

नोव्हेंबर महिन्यातील २६ व २७ तारखेला सलग सुट्या आहेत. त्यामुळे ९ ते २५ नोव्हेंबर या काळात सुट्या द्याव्यात, अशी मागणी काही शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे केली होती. त्यामुळे सुटीबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. महापालिकेच्या शिक्षण मंडळाला प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतीक्षा होती. माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या सहामाही परीक्षा संपूनही सुट्यांचा तिढा कायम होता.

त्यावर मंगळवारी (ता. ७) प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी स्पष्टीकरण दिले. शासनाकडून प्राप्त झालेल्या वार्षिक कॅलेंडरमधील शासकीय सुट्यांनुसारच शाळांना दिवाळी सुटी असेल, असेही त्यांनी सांगितले. त्यानुसार महापालिकेच्या शिक्षण मंडळाने सर्व मुख्याध्यापकांना तसे कळविले. जिल्हा परिषदेच्या शाळा, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनाही याच काळात सुटी असणार आहे.

‘या’ कारणामुळे सुट्यांमध्ये फेरबदल नाही

गणेशोत्सव काळात २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद दोन्ही सण एकाचवेळी आले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ईद-ए-मिलाद साजरी झाली. त्या दिवशी एक शासकीय सुटी देण्यात आली होती. त्यामुळे आता दिवाळी सुट्यांमध्ये फेरबदल केल्यास पुढे एक सुटी जास्त होण्याची शक्यता होती.

पुढे शासकीय सुट्यांमधील एकही सुटी रद्द करण्यासारखा दिवस नव्हता. त्यामुळे दिवाळी सुट्यांमध्येही बदल करण्यात आला नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. वर्षात एकूण ७६ सुट्या असतात, त्यापेक्षा एकही सुटी जास्त होणार नाही, अशी नियमावली आहे. जास्त सुटी झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ होवू शकते