सरकारच्या ताज्या निर्णयामुळे देशभरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी काही राज्यांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या आंतरराज्य वाहतूक खर्चात समायोजन करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे निवडक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये घट झाली आहे. याशिवाय, पेट्रोल पंप मालकांची दीर्घकाळाची मागणी मान्य करण्यात आली असून, त्यांना कमिशनमध्ये वाढ देण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना दरवाढ न करताच पेट्रोल-डिझेल स्वस्तात मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रभाव
गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सतत घट होत आहे. भारतीय तेल कंपन्यांना प्रति बॅरल तेल ७२ डॉलरपेक्षा कमी दराने मिळत आहे. जरी याआधी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली होती, तरी सामान्य जनतेवर याचा बोजा न येऊ देता, कंपन्यांनी दर स्थिर ठेवले होते. या निर्णयाने सामान्य नागरिकांना दिलासा मिळत असून पेट्रोल पंप मालकांना आर्थिक गिफ्ट देण्यात आले आहे.
पेट्रोल पंप मालकांना मिळाले दिवाळीचं गिफ्ट
पेट्रोल पंप मालक संघटना आणि पेट्रोलियम मंत्रालय यांच्यातील चर्चेनंतर, सरकारने पेट्रोल विक्रीवर प्रति लिटर ६७ पैसे आणि डिझेल विक्रीवर ४४ पैसे प्रति लिटर अतिरिक्त कमिशन देण्याचा निर्णय घेतला आहे. या वाढीचा लाभ ग्राहकांना सेवा सुधारण्याच्या उद्दिष्टाने देण्यात आला आहे, असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं.
दुर्गम भागातील राज्यांमध्ये कमी झाले दर
या निर्णयानंतर हिमाचल प्रदेशातील काझामध्ये पेट्रोलचा दर ३.५९ रुपये प्रति लिटरने आणि डिझेलचा दर ३.१३ रुपये प्रति लिटरने कमी झाला आहे. तर उत्तराखंडच्या बद्रीनाथ धाम येथे पेट्रोल ३.८३ रुपये आणि डिझेल ३.२७ रुपये प्रति लिटरने कमी झाला आहे. दुर्गम ठिकाणी असलेल्या नागरिकांना अधिक स्वस्त दरात इंधन मिळावे यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारा निर्णय
धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर घेतलेल्या या निर्णयामुळे पेट्रोल पंप डीलर्सनी सरकारला धन्यवाद दिले आहेत. ऑल इंडिया पेट्रोल पंप डीलर असोसिएशनचे अध्यक्ष अजय बन्सल यांनी म्हटले आहे की, कमिशन वाढल्यामुळे पंप डीलर्सना सेवा सुधारण्यासाठी मदत होईल. कमिशनच्या नव्या दरांची अंमलबजावणी ३०-३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून सुरू होणार आहे.
संपूर्ण देशभरातील ग्राहकांसाठी आनंदाची बातमी
या निर्णयामुळे छत्तीसगडमधील विजापूर, बैलादिला, काटेकल्याण, बाचेली, दंतेवाडा आणि सुकमा येथे पेट्रोल-डिझेलच्या दरात घट होणार आहे. ओडिशातील काही भागांमध्ये दर ४.६९ रुपये आणि ४.५५ रुपये प्रति लिटरने कमी होणार आहेत. इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांना सेवा सुधारित आणि सुटसुटीत मिळेल.