उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी राजीनामा घावा; शिंदे गटाची मागणी

जळगाव – महानगरपालिकेचे उपमहापौर कुलभूषण म पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निधी वाटपात झालेल्या असमतोलाबाबत पत्र दिले. मात्र स्वतः उपमहापौरांनी निधी वाटपात दुजाभाव केला असून आपल्याच प्रभागात सर्वाधिक निधी लाटल्याचा आरोप नगरसेवक दिलीप पोकळे यांनी केला आहे. त्यामुळे उपमहापौरांनी नैतिकतेला समोर ठेवून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पोकळे यांनी केली आहे. निवेदनात म्हटले की, गेल्या २ वर्षांच्या कालखंडात महानगरपालिकेंतर्गत विविध प्रकारचा निधी कुठल्या प्रभागात जास्त प्रमाणात वितरित व खर्च झाला? याबाबत महासभेत महापौर व उपमहापौर यांचे समोर वारंवार प्रश्न विचारले गेले. परंतु अद्यापही त्याचे ठोस उत्तर व माहिती देण्यात आलेली नाही. सर्वात जास्त निधी त्यांचेच प्रभागात त्यांनी पदाचा दुरूपयोग करून खर्च केलेला आहे. जळगाव महानगरपालिकेंतर्गत अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधारणा योजनेत प्रभाग क्रमांक १,३,४,१० व १३ आरक्षित आहेत. असे असताना उपमहापौर कुलभूषण पाटील यांचे प्रभाग क्रमांक १० मध्ये सर्वात अधिक निधी मागील २ वर्षात वितरीत व खर्च झाला. प्रत्येक प्रभागासाठी १ कोटी याप्रमाणे ५ प्रभागासाठी ५ कोटींची तरतूद असताना उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून संपूर्ण निधी त्यांच्याच प्रभागात मंजूर केला.

उपमहापौरांना नैतिक अधिकार नाही

याबाबत महासभेत चर्चा होवून झालेल्या प्रकाराला विरोधदेखील करण्यात आला होता. सर्व सदस्यांनी अशी मागणी केली होती की, उपमहापौरांनी सदरचा निधी समान पध्दतीने वाटप करावा. परंतु तशी नैतिकता त्यांनी दाखवली नाही. मग आज जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न उपस्थित करण्याचा नैतिक अधिकार उपमहापौरांना आहे का? महासभा, विशेष बैठका यांचे इतिवृत्त पाहिले तर लक्षात येईल की, संपूर्ण शहाराचे उपमहापौर असताना फक्त त्यांच्याच प्रभागाचा विचार व विषय केला आहे. संपूर्ण शहराचा विचार करण्याची त्यांची जबाबदारी असतानादेखील त्यांनी संकुचीत बुध्दीने त्यांचाच प्रभागाचा विचार केलेला दिसतो. सन २०१९-२० प्रभाग क्रमांक ४ मध्ये ४ कोटी रूपये, सन २०१९-२० प्रभाग क्रमांक १३ मध्ये ५ कोटी २५ लाख रुपये, सन २०२० – २१ प्रभाग क्रमांक १३ मध्ये २ कोटी १९ लाख रुपये, सन २०२१-२२ प्रभाग क्रमांक १० मध्ये २ कोटी ८९ लाख रुपये, सन २०२१-२२ प्रभाग क्रमांक १० मध्ये १ कोटी ४९ लाख रुपये, सन २०२१-२२ प्रभाग क्रमांक ३ मध्ये २ कोटी ९ लाख रुपये.

jalgaonsandesh

jalgaonsandesh