नितेश राणेंविरोधात तृतीयपंथी आक्रमक; गुन्हा दाखल करण्याची मागणी

भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी तृतीयपंथीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारी पोस्ट सोशल मिडियावर टाकून आमचा अपमान केल्याचे सांगत, काही तृतीयपंथींनी पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यासमोर मंगळवारी रात्रीपासून आंदोलन सुरु केले आहे. पोलिसांनी तृतीयपंथींचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, परंतु राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तृतीयपंथी ठाम राहिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी तृतीय पंथीयांनी रास्ता रोकोचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी बळाचा वापर करुन त्यांना उचलून पोलीस ठाण्याच्या आवारात आणत असताना, पोलीस व तृतीयपंथी यांच्यात झटापट झाली. याबाबत तृतीयपंथी म्हणाले, आम्ही भारताचे नागरिक असून, नितेश राणे यांनी आमच्या जेंडरवरुन शिवी दिली. त्यामुळे न्याय मागणे आमचे काम आहे. याप्रकरणी राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आम्ही केली होती. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता पोलीस राजकीय दबावला बळी पडून तक्रार घेण्यास टाळाटाळ करत आहे. राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी वादातून ‘हिजडा’ शब्दाचा शिवी म्हणून वापर केला. मात्र, ‘हिजाड’ या शब्दाला सांस्कृतिक व सामाजिक ओळख आहे. न्यायालयाने ही ट्रान्सजेंडर ऍक्ट मान्य केल्यावर आम्ही सन्मानाचे जीवन जगू शकतो. हिजडा म्हणून आम्ही जगायचे कसे? पोलिसांनी आम्हाला फरफटत नेऊन धक्काबुक्की केली. बंडगार्डन पोलिसांवर कारवाई करण्यात यावी.

काल रात्रीपासून आम्ही बंडगार्डन पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करीत आहोत. पोलिसांनी केवळ आमचे म्हणणे ऐकून, टोलवाटोलवी केली. ज्ञानेश्वर माऊलींचा पालखीचा परतीचा प्रवास होता, म्हणून आम्ही रस्त्यातून बाजूला झालो. परंतु पोलिसांनी पुन्हा आम्हाला रस्त्यात येऊ न देता कपडे फाडेपर्यंत ओढाओढी केली. राणे याच्यावर ट्रान्सजेंडर ऍक्ट 18 डी प्रमाणे153 (अ) गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस ठाण्यातून हटणार नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी ज्याप्रकारे आमची उचलबांगडी केली त्यामुळे जखमी झाल्याने पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.