दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीला 22 वेळा भोसकलं, दगडाने ठेचून केली निर्घृण हत्या

दिल्लीतील शाहबाद डेअरी भागात एका अल्पवयीन मुलीची चाकूने भोसकून व दगडाने ठेचून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या मुलीला हल्लेखोराने तब्बल 22 वेळा चाकूने भोसकले असून त्यानंतर त्याने दगडाने तिचे डोके ठेचून टाकले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याचा भयंकर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी साहील नावाच्या 20 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

सदर अल्पवयीन मुलीचे व आरोपी तरुणाचे प्रेमसंबंध होते असं बोललं जात आहे. रविवारी त्यांचे काही कारणावरून भांडण झाले. त्यानंतर सदर मुलगी तिच्या घरी जात असताना साहीलने तिला एक गल्लीत गाठले. त्यानंतर त्याने धारदार सुऱ्याने तिच्यावर 22 वेळा वार केले. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानंतर त्याने तेथे पडलेले मोठे मोठे दगड तिच्या डोक्यावर मारून तिचे डोके ठेचले. काही वेळाने तो तेथून निघून गेला. मात्र काही वेळातच तो परत आला व त्याने तिच्या मृतदेहाला लाथा मारल्या व परत त्यावर एक मोठा दगड मारला.

लोकांनी घेतली बघ्याची भूमिका

जेव्हा साहीलने सदर मुलीवर चाकूने हल्ला करायला सुरुवात केली त्यावेळी काही तरुण त्या गल्लीतून जात होते. मात्र त्या पैकी कुणीही साहीलला अडवण्याचा प्रयत्न केला नाही. तर लोकं चक्क तेथून पळून गेली. त्यामुळे लोकांमध्ये काही भावना उरल्या आहेत का असा सवाल केला जात आहे.