मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. 70 जागांसाठी मतदान 5 फेब्रुवारी रोजी होणार असून 8 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर केले जातील. निवडणूक जाहीर होताच दिल्लीमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.
दिल्ली निवडणूक 2025: संपूर्ण वेळापत्रक
- 10 जानेवारी 2025: गॅझेट अधिसूचना जारी
- 17 जानेवारी 2025: नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख
- 18 जानेवारी 2025: नामांकन पडताळणी
- 20 जानेवारी 2025: नामांकन मागे घेण्याची अंतिम तारीख
- 5 फेब्रुवारी 2025: सर्व 70 जागांसाठी मतदान
- 8 फेब्रुवारी 2025: मतमोजणी व निकाल जाहीर
चुनाव प्रक्रियेवरील शंका दूर केल्या
मुख्य निवडणूक आयुक्तांनी मतदान यादीतील गोंधळ, ईव्हीएमवरील आरोप आणि मतदानाच्या टक्केवारीत वाढ यावर सविस्तर उत्तर दिले. त्यांनी स्पष्ट केले की, 2004 ते 2020 दरम्यान 21 राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये 15 वेगवेगळ्या पक्षांची सरकारे सत्तेवर आली आहेत. यावरून निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष असल्याचे सिद्ध होते.
13033 मतदान केंद्रे, खास महिला कर्मचाऱ्यांची जबाबदारी
दिल्लीतील निवडणुकीसाठी 13,033 मतदान केंद्रे तयार केली जाणार आहेत. सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग केली जाईल. 70 मतदान केंद्रांवर महिलांकडून व्यवस्थापन केले जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी 1191 मतदार असतील. 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मतदानाची सुविधा देण्यात येणार आहे.
दिल्लीतील मतदारांची संख्या
- एकूण मतदार: 1 कोटी 55 लाख 24 हजार 858
- पुरुष मतदार: 83 लाख 49 हजार 645
- महिला मतदार: 71 लाख 73 हजार 952
- थर्ड जेंडर मतदार: 1261
2020 च्या निवडणुकीतील निकालाचा आढावा
2020 साली झालेल्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने 70 पैकी 62 जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवले होते. भाजपाला 8 जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेस एकही जागा जिंकण्यात अपयशी ठरली होती. ‘आप’ला 54% मते, भाजपाला 39% मते आणि काँग्रेसला 5% पेक्षा कमी मते मिळाली होती.