दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी सकाळी सक्तवसुली संचालनालयाकडून मिळालेल्या पाचव्या समन्सकडेही दुर्लक्ष करण्याचा विचार केला आहे. यामुळे आता दिल्लीत आप विरुद्ध भाजप राजकीय वाद पुन्हा चिघळणार असं चित्र आहे. अबकारी धोरण प्रकरणावर चौकशीसाठी आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना बोलावण्यात आले होते. परंतु त्याऐवजी ते मंगळवार झालेल्या वादग्रस्त ठरलेल्या चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीचा निषेध करणार आहेत.

यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या आणि आसपासची सुरक्षा तसेच आप आणि भाजप मुख्यालयांच्या परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दोन्ही बाजूंनी आंदोलने होण्याची शक्यता असून सुरक्षा कडक करण्यात आली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने जाहीर केलेल्या व्हिडीओंमध्ये शहरातील विविध ठिकाणी आप आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले दिसत आहेत. हातात फलक आणि पक्षाचे झेंडे घेऊन आणि दुसऱ्या बाजूच्या विरोधात घोषणा देत असल्याचे दिसून आले आहे.
शहरातील दीनदयाळ उपाध्याय रोडवरील ‘आप’ कार्यालयाभोवतीच्या प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम दिसून आला. एक हजाराहून अधिक पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
पोलीस उपायुक्त (मध्य) एम हर्षवर्धन म्हणाले, ‘कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवू नये आणि सर्व काही सुरळीतपणे पार पडावे यासाठी आम्ही सज्ज आहोत. आम्ही सर्व आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.’