कुत्र्याला वाचविण्यात प्रवाशी रिक्षा उलटली; एका प्रवाशाचा मृत्यू

जळगाव – रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा व कुत्र्यांचा त्रास वाहनधारकांना नेहमीचाच झालेला आहे. वाहनांसमोर अचानक कुत्रे आल्याने अपघात होत आहेत. असाच एक अपघात जळगाव भुसावळ दरम्यानच्या महामार्गावर घडला आहे.

रस्त्यावर अचानक आलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात रिक्षा पलटी होऊन यात एका जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर पाचजण जखमी झाले आहेत.

भुसावळ येथील यशवंत डोके (वय ३५) असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासमोर हा अपघात झाला. जळगाव खुर्द येथून भुसावळकडे जाणाऱ्या रिक्षेच्या समोर अचानक मोकाट कुत्रा आडवा आला. या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे रिक्षा उलटली. या अपघातात यशवंत डोके जागीच ठार झाले, तर उषाबाई वारके (रा. भुसावळ), चालक महेश सातव, मंगलसिंग राजपूत, शबानाबाई पिंजारी व नरेंद्र मराठे जखमी झाले. यातील शबानाबाई पिंजारी व नरेंद्र मराठे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळळताच नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात ठार यशवंत डोके यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल केला. याबाबत नशिराबाद पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

ताजा खबरें