दरोडेखोरांनी पळवलेली तरुणी मध्यप्रदेशात सुखरूप मिळाली !

धुळे – जिल्ह्यातील साक्री तालुक्यात शनिवारी रात्री जबरी दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी जबरीने सोनेसह घरातील २३ वर्षीय तरुणीला देखील अपहरण करून नेले होते. ही तरुणी रविवारी २६ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मध्य प्रदेशातील सेंधवा गावी रस्त्याच्या बाजूला मिळून आली आहे. दरम्यान तरुणीचा जबाब घेण्याचे काम सुरू असून पोलीस दरोडेखोरांच्या मागावर आहेत.

साक्री शहरातील सरस्वती नगरातील दौलत बंगल्यावर हा दरोडा पडला होता. निलेश पाटील हे कुटुंबासह राहतात. ते काही कामानिमित्त संगमनेर येथे गेले होते. घरात त्यांच्या पत्नी ज्योत्स्ना व भाची निशा शेवाळे एवढेच होते. रात्री चार ते पाच व्यक्तींनी घरात दरोडा टाकला. त्यात ज्योत्स्ना पाटील यांना बंदूक व चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. तसेच सोने कुठे आहे असे विचारून त्यांच्याकडून अंगावरील व घरातील ८८ हजारांचे सोने घेतले. तसेच, भाची निशा हिचे हात बांधून तिचे अपहरण करून घेऊन गेले होते.

पोलिसांना घटना माहित होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रात्री पासून पोलीस अधीक्षकासह उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी, साक्री पोलीस कसून तपास करीत होते. दरम्यान, सदर तरुणीने रविवारी २६ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास तिच्या पालकांना फोन करून ती सेंधवा येथे असल्याची माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या पालकांनी तात्काळ पोलिसांना याबाबत कळवले.

पोलिसांनी महाराष्ट्राच्या सीमेवरील शिरपूर तालुक्यातील सांगवी पोलीस स्टेशनला माहिती देऊन तात्काळ पोलिसांचे पथक सेंधवा येथे पाठविले. त्यानंतर साक्री पोलिसांचे पथक देखील सेंधवा येथे जाऊन सदर तरुणीला ताब्यात घेत तिला साक्री येथे सुखरूप आणले व पालकांच्या स्वाधीन केले.

दरम्यान सोमवारी पोलिसांनी सदर तरुणीचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर तरुणीला थोडा अशक्तपणा जाणवत असल्याने तसेच मनस्थिती ठीक नसल्यामुळे ती पूर्णतः जबाब देऊ शकलेली नाही. दरम्यान दरोडेखोरांनी सुमारे वीस तास तिला ओलीस ठेवत सेंधवा येथे सोडून दिल्याचे दिसून येत आहे. धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस दरोडेखोरांच्या मागावर असून सदर तरुणी पोलिसांना आणखी काय माहिती देते व त्यावर पुढील तपास काय लागतो याकडे धुळे जिल्ह्यासह खान्देशचे लक्ष लागून आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh