मध्यप्रदेश व गुजरातमधील एजंटमार्फत जळगाव जिल्ह्यातून कापूस खरेदी

जळगाव – खानदेशात थेट खरेदी वेगात सुरू आहे. दर ७५०० ते ७६०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. दर दबावात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कापसाची आवक खानदेशात मागील महिन्यात वाढली. मध्यंतरी पावसाने खरेदी व आवक कमी होती. मागील तीन ते चार दिवसांपासून वादळी पाऊस, गारपिटीची समस्या कमी आहे.

यामुळे खेडा खरेदी पुन्हा वेगात सुरू झाली आहे. सध्या खानदेशात रोज ५५ ते ५६ हजार क्विंटल कापसाची आवक होत आहे. अर्थात रोज १० हजार कापूसगाठींची (एक गाठ १७० किलो रुई) निर्मिती होत आहे. कापसाचे दर महिनाभरापासून ७५००, ७६०० ते ७७०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. दर कमी असल्याने अनेक शेतकरी दरात सुधारणा होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. परंतु खानदेशात किमान ७० ते ७२ टक्के शेतकऱ्यांनी कापूस विक्री केली आहे. मार्चपासून विक्री वाढली आहे. मार्चमध्ये रोज ३५ ते ३६ हजार किंटल कापसाची आवक होत होती. एप्रिलमध्ये आवक वाढली. या महिन्यातदेखील रोज ५० हजार क्विंटल आवक होत आहे.

भाव मात्र ८ हजारांखाली

नंदुरबार, धुळे जिल्ह्यात कापसाची उपलब्धता कमी आहे. कारण या भागात नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारीतच अनेकांनी कापसाची विक्री केली होती. जळगाव जिल्ह्यात कापसाची उपलब्धता बऱ्यापैकी आहे. कारण राज्यात सर्वाधिक कापूस लागवड जळगावात केली जाते. तसेच कापसाची विक्रीदेखील अनेक तालुक्यांत ६५ टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. जळगाव जिल्ह्यात धरणगाव, अमळनेर, पारोळा, जामनेर, भडगाव भागांत ७० टक्के शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली आहे.. परंतु जळगाव, पाचोरा, चोपडा, यावल, मुक्ताईनगर, भुसावळ आदी भागांत फक्त ५५ ते ६० टक्केच शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली आहे. या भागात मुबलक कापूस उपलब्ध होत आहे. जळगाव जिल्ह्यात गुजरात, मध्य प्रदेशातील मोठ्या खरेदीदारांचे एजंट तसेच जिल्ह्यातील कारखानदारांचे एजंट कापूस खरेदी करीत आहेत. खानदेशातील जिनिंग प्रेसिंग कारखाने वेगात सुरू आहेत. यामुळे या कारखान्यांना कापसाची गरज भासत आहे. जळगाव जिल्ह्यातील काही कारखानदार मराठवाडा, पश्चिम विदर्भातून कापूस खरेदी करीत आहेत. पुढे कापसाची आवक कमी होईल, असे दिसत आहे..

jalgaonsandesh

jalgaonsandesh