मुख्यमंत्री शिंदे मंगळवारी पाचोऱ्यात; ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम

जळगाव – राज्य शासनाने जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सुरू केलेला ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम जिल्हास्तरावर घेण्यात आला. आता तालुका स्तरावरील पहिला कार्यक्रम येत्या मंगळवारी (ता. १२) येथे होत असल्याची माहिती आमदार किशोर पाटील पत्रकार परिषदेत दिली.

‘शिवालय’ या आपल्या संपर्क कार्यालयात शनिवारी (ता. ९) दुपारी आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, गणेश पाटील, राजेंद्र पाटील, संजय पाटील ( भुरा अप्पा), संजय गोहिल, पदमसिंग पाटील, किशोर बारवकर, राजेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या कार्यव्यस्ततेमुळे २६ ऑगस्टचा जळगाव जिल्ह्यातील पहिला पाचोरा तालुकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम स्थगित झाला. तो शनिवारी होणार होता. मात्र, मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा अचानक ठरल्याने आता मंगळवारी कार्यक्रम होणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली.

या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, अनिल पाटील, अब्दुल सत्तार, दादा भुसे, डॉ. तानाजी सावंत यांच्यासह १२ कॅबिनेट मंत्री उपस्थित राहणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील पहिला तालुकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम पाचोरा येथे होत आहे.

यानिमित्त नांद्रा (ता. पाचोरा) येथील नर्मदा ॲग्रो या कृषीविषयक प्रकल्पाचे उद्‌घाटन, नगरदेवळा येथील औद्योगिक वसाहत, पाचोरा येथील उपजिल्हा रुग्णालय, क्रीडा संकुल, ऑक्सिजन पार्क यासह विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन केले जाईल.

पाचोरा व भडगाव तालुक्यांतील सुमारे १५ हजार लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचे नियोजन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार पाटील, प्रांताधिकारी भूषण अहिरे यांनी केले आहे. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार पाटील यांच्यासह शासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

ताजा खबरें