पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. भारतीय नौदलानं हा पुतळा बसवला आहे
नौदल दिनानिमित्त पंतप्रधान मोदी हे सिंधुदुर्गात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार, ४ डिसेंबर) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. ते ‘भारतीय नौदल दिना’निमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित होते. हा पुतळा भारतीय नौदलानं बसवला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच तीनही दलांचे प्रमुख, नौदलाचे सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते.
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण : भारतीय ‘नौदल दिना’ निमित्तानं सिंधुदुर्ग किल्ल्यावर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहिले. या ठिकाणी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. त्यानंतर मालवणात युद्धनौकांद्वारे प्रात्यक्षिके करण्यात आली. दरवर्षी 4 डिसेंबर हा दिवस ‘नौदल दिन’ म्हणून साजरा केला जातो.
शिवरायांच्या राजमुद्रेची छाप : छत्रपती शिवाजी महाराज यांनीच भारतीय नौदलाचा पाया रचला, असे गौरवोद्वार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी काढले. भारतीय नौदलाच्या नव्या ध्वजावर आणि लोगोवर छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची छाप असल्याचंही ते म्हणाले. शिवाजी महाराजांनी कमावलेली नौदलाची शक्ती आपण नंतर गमावलो होतो, पण आता ती पुन्हा मिळवायची आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. नौदल दिनाच्या निमित्तानं सिंधुदुर्ग किल्ल्यावर एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त : पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी सिंधुदुर्ग पोलिसांनी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. तारकर्ली, मालवण आणि परिसरातील प्रमुख बाजारपेठा दिवसभर बंद ठेवण्यात आल्या होत्या. याशिवाय चिपी विमानतळ ते तारकर्ली बीच या मार्गावर वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले होते.