भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या ऑडी कारने रविवारी मध्यरात्री नागपूरमधील रामदासपेठ परिसरात एका पाठोपाठ एक पाच वाहानांना धडक दिली. थोड्या थोड्या अंतरावर घडलेल्या या अपघातात काही जण जखमी झाले असल्याचे देखील समजते. अपघातानंतर लोकांनी संकेतच्या गाडीचा पाठलाग केल्यानंतर तो गाडी मित्रांच्या ताब्यात देऊन तेथून पसार झाल्याचे समजते. याप्रकरणी पोलिसांनी अर्जुन हावरे व रोनित चित्तमवार यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान सोमवारी जेव्हा ज्या गाडीने हे सर्व अपघात झाले ती टो करण्यात आली तेव्हा या गाडीचे दोन्ही नंबरप्लेट काढण्यात आले होते. त्यामुळे ही गाडी कुणाची आहे हे समजू नये म्हणून नंबरप्लेट हटवल्याची चर्चा सध्या रंगली आहे.