पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने रब्बी हंगामातील पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. गव्हाच्या दरात प्रति क्विंटल 150 रुपयांची वाढ करून हा दर 2425 रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. याचबरोबर मोहरीच्या दरात 300 रुपयांची वाढ करून तो प्रति क्विंटल 5950 रुपये करण्यात आला आहे.
याशिवाय हरभऱ्याच्या दरात 210 रुपयांची वाढ करून 5650 रुपये प्रति क्विंटल आणि मसुरीच्या दरात 275 रुपयांची वाढ करून 6700 रुपये प्रति क्विंटल इतका दर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन दिवाळी गोड होण्याची अपेक्षा आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी देखील एक दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने त्यांच्या महागाई भत्त्यात (डीएम) 3 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.
राज्य सरकारचा दिवाळी बोनस
दुसरीकडे, महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी विशेष दिवाळी बोनस जाहीर करण्याची तयारी केली आहे. या योजनेतून महिलांना 3 हजार रुपयांचा बोनस मिळणार असून, निवडक महिलांना 2500 रुपये अतिरिक्त दिले जाणार आहेत. यामुळे लाभार्थी महिलांना एकूण 5500 रुपयांचा बोनस मिळणार असल्याची चर्चा आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या या निर्णयांमुळे शेतकरी आणि महिला लाभार्थींची दिवाळी उत्साहात साजरी होणार आहे. शेतकऱ्यांच्या एमएसपीतील वाढीमुळे त्यांचे उत्पन्न वाढणार असून, महाराष्ट्रातील महिलांना मिळणारा बोनस त्यांना आर्थिक सहाय्य देणार आहे.
कोणत्या पिकांवर वाढवला एमएसपी?
- गहू: प्रति क्विंटल 150 रुपयांची वाढ (2425 रुपये).
- मोहरी: प्रति क्विंटल 300 रुपयांची वाढ (5950 रुपये).
- हरभरा: प्रति क्विंटल 210 रुपयांची वाढ (5650 रुपये).
- मसुरी: प्रति क्विंटल 275 रुपयांची वाढ (6700 रुपये).