बदलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेच्या एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर महाराष्ट्रभरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या घटनेनंतर बदलापूर स्थानकात संतप्त नागरिकांनी आठ तास रेल रोको केल्यानंतर सरकारला जाग आली. दरम्यान या घटनेनंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून शिक्षण विभागाने जवळपास चार दिवसानंतर याबाबत एक जीआर काढला आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भाने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून राज्य सरकारचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. शाळा प्रशासनाला ते आदेश पाळणे बंधनकारक असून शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ते सीसीटीव्ही वेळोवेळी तपासावे लागणार आहेत. शाळेत लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यास 24 तासात शिक्षणाधिकारी यांना याबाबतची माहिती द्यावी लागणार आहे. या तरतुदींचे पालन न केल्यास शाळांवर कारवाई करण्यात येईल असेही या जीआरमध्ये म्हटले आहे.